[४२५] श्री. ४ एप्रिल १७५३.
पै॥ चैत्र शुध्द ७ मंगळवार
शके १६७५.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी त्रिंबकराऊ विश्वनाथ स॥ नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल त॥ छ २९ जमादिलावल पावेतों वर्तमान यथास्थित असे. विशेष. आपण पत्र पाठविलें तें पावलें. लिहिलें वर्तमान सविस्तरें कळलें. महायात्रेस जावयाचा निश्चय आहे. तरी राहुटी १ येक, उंट १ येक, व घोडे १ येक. येणेंप्रमाणें पाठवून द्यावें ह्मणोन लिहिलें तें त्याजवरून सरकारची राहुटी येक सामानसुध्दां व कारवान मराठा जात, १ येणेंप्रमाणें रघोजी सूर्यवंशी जासूद जथें यमाजी नाईक याजबराबर पाठविले आहेत. घेऊन पावलियाचें उत्तर पाठवून दिल्हें पाहिजे. उंटास व घोडयास सातारियापावेतों वाटखर्च बरोबर रुपये ५ पांच दिल्हे आहेत, त्याचा हिशेब घेतला जाईल. रामसिंग कारवान यास छ १६ जमादिलावलचा रोजमुरा दीडमाही येथें दिल्हा असे. पुढें दीड महिनीयानें रु॥ ४ चारप्रमाणें देत जावा. आपण वरातेचा मजकूर लिहिला त्यास व र॥ श्रीमंतांनीं कोणते ऐवजी दिल्ही, त्याचा मजकूर आह्मांस ठाऊक नाहीं. घोडयास दररोज चंदी कैली पाऊण पायलीप्रमाणें आहे व उंटास दाणा दररोज कैली
एक पायलीप्रमाणें देत जावा. कारवान मजकुरास येथें दूर देशास जातो स॥ मुलामाणसाचे बेगमीबद्दल रुपये २० वीस दिल्हे आहेत. तुह्मी तिकडे रोज पुरा दीडमाही मात्र देत जावा. जास्ती न द्यावें. नफर मजकूर हुजूर आल्यावर जें द्यावयाचें तें पावेल. श्रीमंतांकडील अलीकडे वर्तमान दीडमहिना कांही आलें नाहीं. श्रीरंगपट्टणास जातों, इतकें मागें लिहिलें आलें होतें. श्रीमत् राजश्री दादांनी अमदाबादेस मोर्चे लाविले. त्यास शहर घेतलें ह्मणोन वर्तमान आलें. कळावें ह्मणोन लिहिले असे. बहुत काय लिहिणे. लोभ असो दिल्हा पाहिजे. हे विनंति.