[४२३] श्रीनृसिंहसत्य. जानेवारी १७५३.
तीर्थरूप महाराऊ राजश्री दीक्षित स्वामीस सेवेसी :-
विद्यार्थी यादोराऊ वाशीकर चरणावर मस्तक ठेवून शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि. स्वामी सैन्यास गेले, उद्योग बहुत, यामुळें आमच्या विनंतीचें विस्मरण जालें. येथें आल्यावरही भेटीचा लाभ न जाला. वातानें पायांस श्रम दिधला, यामुळें सेवेसी पावलों नाहीं. दुसरें श्रीकृपेनें हरिभक्तांस यश प्राप्त जालें. सातारयाचेंही कार्य करून घेतलें. सर्वांठायी लेख आले तेणेंकरून चित्तास बहुत आनंद जाला. परगणे शेवगांव जमाजी शिंदे व मल्हारराव होळकर यांस दरोबस्त जाला. स्वामीच्या कृपेनें मोगलाईकडील तर सर्व पत्रें अनुकूल आली होती. सांप्रत ज्यांस जागीर जाली त्यांची पत्रें आली पाहिजेत. याविषयी स्वामीनीं कृपा केलियावाचून सिध्दी दिसत नाहीं. पहिल्यापासून अंगिकार केला असे, पुढेंही करतील. याविषयी चिरंजीवास सेवेसी पाठविलें असें. कृपा करून जयाजी शिंदे व मल्हारराव होळकर व दामोदरपंत वजीर यांशिवाय जे स्वामीचे सेवांत असतील, त्यांस लिहावें कीं, ताकीदपत्रें आपल्या नायबांस पाठवून देणें. दुसरें एक पत्र नरहरराव बाबतीवाले यांस पाठविलें पाहिजे की, पाथडी वगैरे गांवे २६ यांच्या हिश्शांत आली, तुह्मी यांचे काम यांचे हातें घेणें व दसखत करून हवाला व जिम्मा यांचा यांस देवविणें. हे विनंति.