[४१९] श्री. १७५२.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेवी दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति उपरि. खान मुरादखानाजवळ बोलिले की, फिरंगी आदिकरून बहुतकरून आह्मांस अनुकूल आहेत.आपली अनुज्ञा जाली ह्मणजे सर्व गोष्टी आमच्या पूर्ववत्प्रमाणें होऊन येतात. त्यास हा मजकूर मुरादखान जीवनरायाजवळ बोलिले. त्यांनी विदित केला. व आणखी बोलिले कीं, खानाजवळ आपला इतबार होत नाहीं. सेवेसीही राहावें याअन्वयें कितेक कारणें आहेत. त्यास भेटीस येतों ह्मटलें. परंतु फिरंगी आदिकरून कितेक खानाकडे ममतेंत आले कैसे व नवाबाचें येणें अवरंगाबादेस होत नाहीं, तेव्हां खान एकाएकी उठोन नवाबाकडे जाणार नाहींत, ऐसे कितीक प्रकारें आमचेही चित्तांत संशय वाटले. यास्तव गोष्टीचा शोध करून लिहिणें ह्मणोन तुह्मास लेहून पाठविलें, परंतु इतक्या गोष्टी प्रमाण ऐसें खान बोलले. इतका इतबार खानाचा मुरादखानाचे ठायी काय ह्मणोन ? ऐशियास आह्मास सर्व लबाडी भासली. त्यास आपण खानास पुसोन लिहून पाठविणें. सर्वही खानास अनुकूल होऊन खानाचे मनोभीष्ट सिध्दीस जात असेल तर आह्मास संतोष आहे. ++++ खानास सूचना करणें. त्यास न पाठवि+++++ इतबारी लवकरच पाठवीत आहोत. त्याजबरोबर कितेक सांगोन पाठवायाचें तें पाठवूं. सर्व शोध करून लेहून पाठवणें. बहुत काय लिहिणे हे विनंति.