[४१७] श्री.
विनंति. दिल्ली दोन दिवस पाऊस पडला. एक दिवस गारा अधशेराची (एक) प्रमाणें पडला. तेणेंकरून नावेवरी माणसें होती ती कुली मेली व जनावरें मेली. पाणी काशीत गंगेस उराइतकें आले. आश्चर्य जालें. कोइलेकडे नानकपंथी शिष्य उठला. त्याणें दिल्लीवर चाल केली आहे. त्याजपाशी फौज मोठी आहे. काशीत सुभयता जाली. रोकडी आहे. पुढें पहावें. राजश्री कृष्णाजी नाईक याचा लेक नारोबा नाईक तिकडे येणार. त्याजबरोबरी वर्षासनाचा हिशेब व कबजा पाठवितों. सरकारांत आमचे रुपये बाराशें निघतील. परभूंनीं प्रायश्चित्तें घेतली, त्याचे रुपये राजश्री बाबा आले ह्मणजे देऊन कबजे पाठवितों,. रामकृष्ण दीक्षित गोडसे यांची कबुली पाठविली. घेणें. हे विनंति.
[४१८] श्री.
विनंति उपरि. वसडांतून शिवभट साठे व रघूजी भोसले व कृष्णभट पाटणेकर यांची पत्रें आली आहेत. विशेष कांही नाहीं. बांदे घेतले. पुढें माहोराकडे गेले ह्मणोन लिहिलें आहे. ऐवज कांही थोडा बहुत हातास यावयाचा आहे. ह्मणून कृष्णभटांनीं लिहिलें आहे. कळलें पाहिजे. हे विनंति.