[४१६] श्री. १७५२.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान साष्टांग नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणोन स्वकीयें लिहीत असिले पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र श्रावण शुध्द १४ पाठविलें तें श्रावण बहुल तृतीयेस पावलें. अबदुलरजाखान याचे पुत्रास दरगाकूलीखांनी यांणी आपले घरी बोलाऊन गोष्टमात आह्मांसमक्ष केली. दरगाकूलीखांनी आपणांस लिहिलें आहे त्याजवरून कळेल, ह्मणोन लि॥ तें कळलें. दरगाकूलीखां एकवचनी, प्रमाणीक आहेत. जें बोलतील त्याप्रों करितील. तदनुरूपच रफीक अबदुलरजाखानाचे पुत्रास केलें. उत्तम आहे. त्याचे पत्राचें उत्तर पाठविलें असे. तें त्यास देणें. फेरोजंग नर्मदातीरांस आलें ह्मणोन लिहिलें तें कळावें. अबदुलरजाखानाचें पुत्राची अर्जी फेरोजंगास पाठवून देणें. त्याजकडे पाठवून सलाबतजंगांनी थोरले नवाबाच्या बाईकांस भागानगरास बोलाविलें तिकडे जातील. पकारनामक व सकारनामक तेथे येतात. ते गोष्टी सलाबतजंगाचे पक्षाच्या सांगतील तर त्या मान्य न कराव्या. राजश्री मल्हारबांनी जो पक्ष धरिला तोच आपण बळवावा. आह्मांसही त्याजकडे पत्रें पाठवावी लागतील, तसें आमच्याविशी त्यास लेहून पत्र येथें पाठवावे ह्मणोन लिहिलें तें कळलें. आह्मी जो पक्ष धरिला तोच धरिला, त्यास अन्यथा करीत नाहीं. सकारनामक व नकारनामक मोह घालतील. तो कबूल करीत नाहीं. सरदारांनी आमच्या लिहिल्यावरून फेरोजंगास आणिलें तेंच सिध्दीस नेणें उचित जाणतों. आपलेविशी सरदारांस पत्र पाठविले असे. बहुत काय लिहिणें. हे विनंति.