[४१५] श्री. १८ डिसेंबर १७५२.
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी कृष्णाजी रघुनाथ कृतानेक साष्टांग नमस्कार विनंति येथील कुशल मार्गेश्वर वदि १२ मुक्काम लष्कर श्रीमंत, नजीक यादगिरी, जाणोन स्वामीनीं आपले कुशल लेखन निरोपीत असावें. यानंतर येथील वर्तमान तर :- नवाब सलाबतजंग याचा करार कीं, उभयतां मिळोन कर्नाटक प्रांतांत जावें ऐसा होता. हालीं मोगल कलबुर्गियास आहेत. शिपायांचा दंगा फार. लोकांचाही फितूर आहे. सर्वांचे मतें फिरंगी नसावे. मोठा राडा पडला आहे. मोगल तो येतां दिसत नाहीं; परंतु श्रीमंतांचा आग्रह कीं, दोन महिने स्वारी कर्नाटकप्रांतांत करावी, थोडाबहुत ऐवज शह देऊन घ्यावा आणि पुणियास यावें. यावर काय होईल तें न कळे. आमचें वर्तमान तर चंदावरास रवाना केलें. आजच स्वार होऊन जातों. पुढें जें होईल तें सेवेसी लिहितों. बहुत काय लिहिणें. हे विज्ञप्ति.