[४१४] श्री. १७ डिसेंबर १७५२.
पै॥ मार्गशीर्ष व॥ १० शनवार
शके १६७४ अंगिरानामसंवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी रघुनाथ बाजीराव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल त॥ छ ९ सफर पावेतों स्वामीचे आशीर्वादें यथास्थित असे. विशेष आह्मी बालाघाट उतरून खालीं एक फरदापूरचे घाटांनी अमदाबादेस जाणार. त्यास औरंगाबादच्या सामारें चार पांच कोस आल्यावर आपण यावें व लाख दोन लाख त॥ ऐवज असावा. तरी आपण कर्ज मिळऊन तरतूद करून ठेवावी. व्याज भारी न पडे. हलके व्याजानें ऐवज तरतूद करून अगत्यरूप ठेविली पाहिजे. ते आपल्यावर व्याज पाहून ऐवज सरकारांत घेतला जाईल. तूर्त जसे मिळाले तसे पाहून ठेवावे. आह्मी आपलेपाशीं लवकरच येतों. तरतूद मात्र जरूर जरूर करून ठेवावी. येथे रोजमऱ्यासदेखील ऐवज नाहीं. मुलूख आपला सुटेल. हजारों पंच पडतात. अमदाबादेस गेलियावरी ऐवज मोबदला करून, तूर्त तरतूद करून ठेवावी. हे विनंति. किरकोळ जिन्नस खरेदी करावयास वगैरे कितेक कामास लेंबेकर धुराज पाठविले आहेत. तरी यांस दहा हजार रुपये तूर्त द्यावे. ज्या मितीस पावतील त्या मित्तीस देखत देऊं. यावेळेस रुपये जरूर पाहिजेत. जरूर जरूर जाणून लिहिलें आहे. छ १० सफर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.