[४१३] श्री. ३० डिसेंबर १७५२.
श्रीसर्वउपमायोग्यवेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
सेवक मुकुंदराव विश्वनाथ साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील क्षेम त॥ मार्गेश्वर वद्य दशमीपावेतों सुखरूप व आपले शुभचिंतनांत आहोंत. विशेष. एक संवत्सर जाला,आपण सैन्यांत आहां व आपण कधींही पत्रद्वारें परामर्ष न केला. हें आपणांस उचित नव्हे. श्रावणमासीं भागानगरीं माधोराव सैहदलष्करखांचे समागमें येऊन भेटले होते. त्यांच्या सांगितल्यावरून कळूं आलें कीं, दीक्षितस्वामी तुमचें स्मरण करीत होते व कितीएक कृपावचनें बोलिले. हे ऐकून चित्तास बहुत समाधान जालें कीं, बाह्यात्कारें स्मरण करीत नाहीं; परंतु अंतस्थें चित्तापासून दया आहे. ऐशीच सदैव कृपा असूं देणें. विशेष. कार्तिकमासीं राजश्री प्रधानपंताची भेटी जाली. कितीएक कार्यांस नवाबाचे सैन्यांत जाणें अगत्य आहे. परंतु श्रीमंतांहीं बहुत कृपा करून आज्ञा केली कीं, इतकें त्वरेनें जायाचें काय कार्य आहे, येथेंच असा. यास्तव एक मासपर्यंत येथें राहून, यांची मर्जी रक्षून आज्ञा घेतली. नवाबास आमचेविषयीं बहुत सांगितलें. ईश्वरइच्छेनें सत्वरच अनुभवास येईल. जागिरीची जफ्ती उठवायाविषयीं पत्रें दिधलीं. जफ्तीमध्यें कितेक पैका गेला हे सविस्तर लिहून आणवा, आह्मीं आपल्यापासून देऊं. ऐसें प्रधानपंत बोलिले. वस्त्रें दिधलीं. इ० इ० इ०. हे विनंति.