[३९६] श्री. ३ जुलै १७५२.
पूज्यरूप वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी नरसिंगराव शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल आषाढ शुध्द तृतीया जाणोन आपलें कुशल वर्तमान सदैव लिहीत असलें पाहिजे. विशेष. कृपा करून पत्र पाठविलें तें पावलें. वर्तमान विदित जालें. राजश्री मल्हारराव होळकर व गंगोबा दिवाण यांचें नांवें पत्रें पाठविलीं तीं पावलीं. तीं जवळ ठेविलीं आहेत. पुढें भेटीस जाऊं तेव्हां समक्ष देऊं. परंतु श्रीमंत पंत प्रधान स्वामीचें पत्र माझेविषयीं मल्हारजी बाबाचे नांवें न पावलें. त्या पत्रासाठीं आपण पंतप्रधानांस लिहिलें आहे कीं नाहीं हें कांहींच न लिहिलें. बहुधा तर आपण लिहिलेंच असेल, कृपा करून तें पत्र अगत्य आणविलें पाहिजे. तें बहुत कार्याचें आहे. याविषयीं आपण श्रम करून पत्र आणवितील. उत्तरेचें वर्तमान विशेष कीं:- फेरोजजंग सीरोजेस पावले. तेथून खंडेराव होळकर हाडियाचे घाटास नावाजमा करण्यास पाठविले. सत्वरच नर्मदा उतरतील. मल्हारजी त्वरा करून घेऊन येतात. आपण मल्हारजी बाबास व गंगोबास पत्र खाजगी लिहितील,त्यांतही माझेविषयीं दोन अक्षरें लिहिली पाहिजेत. याविषयीं स्मरणपूर्वक अगत्यरूप लिहितील. वरकड सर्व कुशल असे. हे विनंति. सेवेसी विद्यार्थी माधवराव शिरसाष्टांग नमस्कार. विनंति उपरि कृपानिरंतर असो दीजे. हे विनंति.