[३९३] श्री. २७ मार्च १७५२.
पौ चैत्र वद्य १२ मंगळवार
शके १६७४ अंगिरानाम संवत्सरे.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील वर्तमान चैत्र वद्य अष्टमी जाणून स्वयें कुशल लिहिलें पाहिजे. विशेष बहुत दिवस येऊन तिकडील वर्तमान कळत नाहींत. असें नसावें. खानाचा भाव काय, दिल्लीकडील वर्तमान तेथें काय आहे, राजाजीचें कर्तव्य काय, तें जरूर ल्याहावें. इकडील वर्तमान :- चिरंजीव राजश्री दादाचे हवाली डबाई, पारनेरा दमाजी गायकवाडांनीं केला. मुलखाची वांटणी होत आहे. सर्व स्वामीचे आशीर्वादाचा प्रताप. सामोपचारें कार्य विल्हें लागलें. येणेंकरून सरकार काम होऊन गायकवाडाचें बरें जाहालें. मुलखाचें रक्षण, आपले सेनेचें रक्षण जाहालें. चिरंजीवास यश आपले कृपेनें प्राप्त जाहालें. आपणांस संतोषासाठीं वर्तमान लिहिलें असे. येथील वर्तमान तरी:- कलहप्रसंगें देश उद्ध्वस्त जाहाला. रुपया नाहीं. याजमुळें मोठी वोढ पडली. कर्ज अती जाहालें. सर्व संकटें मागें परिहार जाहालीं. पुढेंही देव-ब्राह्मण-कृपेनें कुशलच होईल. विस्तर काय लिहिणें. लोभ असो दीजे. हे विनंति.