[३९१] अलीफ. ८ सप्टंबर १७५१.
पौ छ २८ माहे शवाल
सन ११६१.
दीक्षितसाहेब मुशफिक मेहेरबान सलामत आजीं ज्यानब महमद मुरादखा बाद बंदगी सलाम आं कीं :- साहेबांस नवाब नसीदजंग बहादर यांनीं चोपदरा बोलावूं पाठविला. साहेबीं सांगून पाठविलें कीं, सकाळ चार घडी दिवसास येतों. ऐशियास, साहेब नवाबसाहेबाच्या दिवाणखानियांतून उठून गेलियावर आह्मीं नवाबसाहेबांस अर्ज केला कीं, आह्मीं दीक्षित साहेबांस आबाजीच्या कामासाठी बोलाविलें होतें, आजी साहेबीं त्यांजला आबाजीचें काम न फर्माविलें. मग नवाब साहेबीं फर्माविलें कीं, अगोदर मुफसल तुह्मीं जाहीर कां न केलें, आतां सकाळ बोलावून सांगतों. साहेबीं चोपदाराबरोबर सांगून पाठविलें कीं, सकाळ येतों. ऐशियास, आज अमावास आहे. साहेबीं आज अमावास्येस न येणें. सकाळ पाडवियास सकाळचे चार घटका दिवस चढतां खामखा येणें. अमावस्येस जाबसाल कामाचा नाहीं. सकाळ पाडवियास खामखा येणें. यश साहेबांस आहे. हे किताबत.