[३९०] श्री. २० आगस्ट १७५१.
पौ भाद्रपद शु॥ ११ मंगळवार. बा
जोडी जासूद. संमत १६७३, प्रजा-
पति नाम. छ ९ सवाल. शुध्द १२
गुरुवारीं जबाब दिल्हा.
पु॥ वेदमूर्ती राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि. आपण तेथील आशय लिहिला कीं, मुखेंकरून नम्र बोलतात, परंतु बऱ्हाणपुरांत फौज ठेवितात, येथेंही बहुत सावधतेनें तरतूद करतात, हें जाणून आपण सावध होऊन सेना सिध्द करावी ह्मणून लिहिलें, येणेंकरून बहुत उत्तम जाहालें. श्रीकृपेनें येथेंही सेनासिध्दता सत्वरच होईल. आह्मीं त्यांशीं पूर्वीं स्नेहच केला. आतांही स्नेह वर्धमान व्हावा हेंच इच्छित असतों. त्यास त्यांनीं सेना सिध्द केलिया ईश्वर आह्मासच नफा करील. आह्मीं आपलेतर्फेनें अंतर पडूं देणार नाहीं. जुनीं फौज दूर किती केली, नवी कशी ठेविली, किती ठेविली चंद्रसेनाचा लेक, सुलतानजी निंबाळकराची समजाविशीं जाहाली कोणे प्रकारें, सैद लष्करखानाशीं कसें आहे, हें सर्व लहान मोठें जरूर ठिकाणीं लावून आपण लिहिलें पाहिजे. रामदासपंतांनीं आह्मास पत्र लिहिलें होतें. त्यांत लिहिलें होतें कीं, जानबास आपलें पत्र गेलें आहे व आह्मींही लिहिलें आहे, येतील. जानबांनीं तों लिहिलें आहे कीं, त्यांचें पत्र येईल तेव्हां येऊं. आपण त्यासी आठा चहूं दिवसांनीं भेटतच असतात, त्यासमयीं बोलावें कीं, जानबास जावयाविशीं पत्र ल्याहावें. जनांत उगीच संशय वर्धमान होतो हें कामाचें नाहीं. तेही स्नेह इच्छितात, परंतु दिल्लीकडील, आणखी कोणीकडील कजिया नसतां, खजाना खर्च करून फौज ठेवणें होतें याजमुळें संशय वाढविणार बहुत आहेत. याप्रकारें बोलावें. आमचा निश्चय हाच सांगत जावा कीं, तुह्मीं सर्व प्रकारें एकनिष्ठता धरीत असतां आह्मांस कलह इच्छा नाहीं, किंबहुना आमचें कार्य आपण करावें, आपलें कार्य करूर आह्मां योग्य असेल तें आमचे हातून करून घ्यावें, गायकवाडावर जातां आपण फौज कुमकेस पाठविली तेणेंकरून बहुत भरंवसा धरितों. ऐसें प्रकारें गोड बोलून संशय दूर होत तें करीत जावें. खानाचीही भेट होतच असेल. सारांश आह्मीं कलह करीत नाहीं. त्यांनींहून आरंभ केलिया श्रीकृपेनें सिध्द आहों. शंभराशीं राजकारणें केलीं तरी ते घरींच राहतील. गांठ पडतां त्यांशीं आह्माशीं मात्र पडेल. छ १ सवाल. हे विनंति. जानबास त्यांनीं पाठवावें, त्यांनीं यावें, ऐसें जाहालें असतां [ ठीक पडेल.] विलंबावर घातल्यास विशेष संशयवृध्दि व्यर्थ होणार. यास्तव सत्वर ते येत ऐशीं पत्रें त्यांस रवाना करणें. कदाचित् नच पा ++++++ असला तर तोही लिहिणें. हे विनंति.