[३८७] श्री. १४ जुलै १७५१.
पौ श्रावण शुध्द ७ गुरुवार,
शके १६७३ प्रजापति नाम
संवत्सरे
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी:-
सेवक बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता छ १ रमजान जाणून स्वकीय लिहिणें. विशेष. आपण पत्र विस्तारें पाठविलें त्यावरून सविस्तर अर्थ अवगत जाहला. ऐशियास, मागें पंधराची जागीर दिल्लीकडून गाजुदीखान न आलें, पातशाहाचें कृपापत्र आलें, तर देऊं, ऐसे ते बोलले होते. आह्मी अवश्य ह्मणून ह्मणत होतों. ते समयीं रदबदली करून बोलिले शेवटास नेणें नव्हतें. यास्तव मोघमच मजकूर ठेविला. सांप्रत गाजुदीखान राहिले, यास्तव आमचें प्रयोजन नाहीं, ऐसें मनांत आणून उडवाउडव करीत असतील तर करोत. घरींदारीं पेंच बहुत रामदासपंतास आहेत. आह्मीं उदासीनपण दाखविल्यास कांहीं तरी भारी पडेलच. आह्मांस तो मोठया मोठया नफ्याचा भरंवसा त्यांपासून आहे. राजश्री जानवाचे बोंलण्यांत फारच मजकूर होता. पुढें त्याप्रमाणें असेल असें बहुतच कागदोपत्रीं जालें. थोराथोरांची एकवाक्यता दिसल्यास दूरवर दबाव फार असतो. रामदासपंतांनीं करारच केला आहे कीं, तुमचें कर्ज फिटोन तुमचे हातून मोहरांची दक्षणा वाटवतों, वडिलांचे इतिफाकानें सा सुभ्यांचा यथास्थित बंदोबस्त जो थोरले नबाबांस न जाहला तो करितों. आणखीही कितेक प्रकार बोलले. ते जाणत असतीलहे सर्व आशय तुह्मीं बोलत जाणें. आमचे मनांत त्यांशीं स्नेह करावा, त्यांचें साहित्य सर्व प्रकारें करावें, हेंच आहे. वरकड बनाजीपंताचे पत्रीं वर्तमान लिहिलें तें कळेल. छ मजकूर. बहुत काय लिहिणें. हे विनंति.