[३८६] श्री. ९ जुलै १७५१.
पौ श्रावण शु॥ ३ रविवार,
शके १६७३, बराबर जासूद.
जाब श्रावण शु ६, बुधवार.
वेदशास्त्रसंपन्न राजश्री वासुदेव दीक्षित स्वामीचे सेवेसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणोन स्वकीय लिहीत गेलें पाहिजे. विशेष. नवाब सलाबतजंग यांणीं बराणपूरचे सुभ्याकडून तीन लक्ष रुपये देविले होते. त्यापैकीं दीड लक्ष रुपये राजश्री बनाजी माधवराव यांचे पदरीं शहरीं राजश्री रामदासपंतांनीं घालविले. तो ऐवज अर्काट गंजीकोट पदरीं पडला, ह्मणोन मशारनिलेंनीं लेहून पाठविलें, व त्याच ऐवजापैकीं येथें एक लक्ष पंचेचाळीस हजार रुपयांची हुंडी बनाजीपंतांनीं करून पाठविली. शेंकडा दीड रुपया हुंडणावळ देऊं केली. त्यास सावकार असें ह्मणतात कीं, अर्काट प्रांतीचा ऐवज असेल त्यास शेंकडा हुंडणावळी बट्टा एक रुपया पुण्याचा पडेल, आणि जुने बेश रुपये घ्यावे, याप्रमाणें चाल आहे. त्यास दीड रुपया हुंडणावळी देऊन, फिरोन अर्काट गंजीकोट रुपया कसा घ्यावा ? ये गोष्टींत सरकारची नुकसानी आहे. हुंडीचा रुपयाचा दाम देत असाल तर घेऊं, नाहींतर, खजिन्यांतून रुपया आला आहे, तोच आमचे पदरीं घाला. तेथें आह्मीं घेऊन हुंडणावळीचा दर शेंकडा एक रुपयाप्रमाणें आह्मांस द्यावा, ह्मणजे सरकारची नुकसानी होणार नाहीं; याप्रमाणें सावकार ह्मणतात. याकरितां तुह्मांस पत्र लिहिलें आहे. तर खजिन्यांतून रुपया कोणे प्रतीचा आला आहे, हुंडणावळीचा मजकूर कसा आहे, येथें हुंडीचा रुपया कोणे रीतीनें भरावा, वगैरे वर्तमान मनास आणून लिहिणें. इ० इ० इ० रा छ २६ साबान. कोणास न कळत यथार्थ शोध जरूर लिहिणें. हे विनंति.