[३८५] श्री. २७ जून १७५१.
पौ आषाढ वद्य ६
बुधवार, शके १६७३
प्रजापतनाम संवत्सरे,
छ २० शाबान.
वेदमूर्ति राजश्री वासुदेव दीक्षित स्वामी गोसावी यांसी :-
विद्यार्थी बाळाजी बाजीराव प्रधान नमस्कार विनंति. बहुत दिवस पत्र येत नाहीं, ऐसें नसावें. सदैव पत्र पाठवीत असावें. विस्तारें बाळाजीपंतास लिहिलें आहे, त्या पत्रावरून कळेल. येथील वर्तमान तरी:- राजश्री स्वामी आईसाहेबांचे हातून सुटले. यास्तव तेथील फौज काढिली असे. कांहीं दिवशीं सुमुहुर्तें खालींही येणार. गुजराथेंतील ठाणीं मुलुख हवालीं करावा, मग सोडावें, असा करार शफतपूर्वक दमाजी गायकवाडांनीं केला. यास्तव फौज विठ्ठल शिवदेव रवाना केले. बोलल्याप्रमाणें वर्तले तर उत्तम. नाहीं तर स्वामींचें आशीर्वादें जबरदस्तीनें घेतच आहों. मल्हारबानीं तिकडील कार्य उत्तमच केलें. पुढें छावणीं कोठें केली हें कांहीं लिहिलें आलें नाहीं. तेथें आलें असेल, तें ल्याहावें. छ १४ साबान. हे विनंति.