[३७६] श्री. १३ फेब्रुवारी १७५१.
पै॥ चैत्र शुध्द ६ गुरुवार
शके १६७३ प्रजापतिनाम.
तीर्थस्वरूप दादा वासुदेव दीक्षित स्वामी वडिलांचे सेवेसी :-
केशवाचे शिरसाष्टांग नमस्कार विनंति उपरी येथील क्षेम फाल्गुन वद्य १४ बुधवार जाणोन वडिलांचे आशीर्वादें समस्त सुखरूप असों. विशेष. येथील वर्तमान बाळकृष्ण दीक्षित व मी, दोघे गयेस गेलों होतों. वडिलांचें गयावर्जन उत्तम जाहालें. ब्राह्मणभोजन होत होतें. येवढयामध्ये बापूजीपंतांचें पत्र गेलें जें, पठाण प्रयागास आले, नवें शहर लुटिलें, बायका बंद नेल्या. काशीस येणार, काशीमध्यें मोठा आकांत जाहाला, दोन दिवस दिवा शहरांत लागत नाहीं. हें ऐकून, नवाबास गयेमध्यें ठेवून, मी स्वार होऊन, चौथे दिवशी घरास आलों. बाबाचे स्त्रीसही गयेस मागाहून पाठविली आहे. दहा दिवस काशीमध्यें मोठा प्रलय जाहाला. ऐशीं रुपये गाडीचें भाडें पटण्याचें जाहालें. ओझ्यास मनुष्य मिळेना. साव सहा सर्व पळोन गेले. मनुष्य निघोन बाहेर कोणी मिरजापुराकडे, कोणी अजमगडाकडे, कोणी गंगापार ज्यांस जिकडे वाट फावेल तिकडे गेले. तव पठाणास वर्तमान कळलें. तेव्हा त्यानें साता सावकारांचे नावें परवाणे पाठविले जे, तुह्मीं काशीतून कां पळता ? मी पादशाही बंदा आहें, शहर लुटावयासी आलों नाहीं, मला बदलामी न करणें, लोकांस दिलासा देऊन शहरांत सुखरूप राहणें, रयतेशी काय आहे ? नवाबाचे अम्मलदार असतील त्यांस पुसों, रयतेशीं काय आहे ? हे परवाणे आले, व कोतवालही गंगापुरेयास पांचा स्वारांनिशीं पाठविला. उदयिक बसावयाची साइत आहे. आतां लोक फिरोन शहरास येऊं लागले. यात्रा प्रयागाहून निघाली. मिरजापुराहून मोहनच्या सराईस आली. तेथें रात्रीस येऊन डाका दोनशें मनुष्य येऊन पडलें. चाळीस पन्नास मनुष्यें जीवेंच मारिलीं. सदाशिवभट इंगळे व त्याची भावजय तेथेंच वारली व नारो महादेव मुळे पारोळेकर, त्याचा बाप व तो दोघे मेले. त्यांच्या बायका सत्या जाहाल्या. शता दोहों शतांस जखमी जाहाले. सत्यानास यात्रेचा जाहाला. लुटून गेले. असें कधी जाहाले नवतें. शहरांतही असें कधी जाहालें नाहीं. केवळ लोक भयभीत आहेत. अद्याप स्वस्थ नाही. लोक बहुत हडबडोन गेले आहेत. पुढें विश्वेश्वर काय करील ते पाहावें.