[३७५]A श्री. २१ फेब्रुवारी १७५१.
दिल्लीचे वर्तमान, र॥ उधोपंत हरकारे :-
वजीर छ २६ रबिलावलीं रुकसत होऊन महाबतखानाचे रेतींत डेरेदाखल जाहाले. छ ३ माहे रबिलाखरीं तेथून कूच करून किसनदासाचे तळ्यावर डेरेदाखल जाहाले. मल्हारजी नजदीक आले. सांप्रत विचार यमुनेपार होऊन पठाणाशीं युध्दप्रसंगच करावा. पुढें युध्दाचा प्रसंग मोठा आहे. यानंतर फेरोजंग बहादूर यांणी दक्षणेस यावयाची तयारी केली. जागा जागा कागद पाठविले. दहा हजार स्वार जमा होतील. कितेक उमराय सांगातें तैनात होतात. आपले लेकास हुजुरांत ठेवितात. पहावें. होऊन येईल तें खरें. पंतप्रधान यांची उमेद बहुतशी त्यांस आहे. वकिलांनी त्यांची खातरजमा बहुत केली आहे. छ ५ माहे रबिलाखर, सन ३. छ ६ जमादिलावल सन ४.