[३७५] श्री. २० जानेवारी १७५१.
स्वामी वडिलाचे सेवेसी. तापीपूरस्थ विद्यार्थी याचा स॥ नमस्कार विनंति उपरि माघ शु॥ ४ जाणून आपलें वैभव लिहीत गेलें पाहिजे. यानंतर आपलें आशीर्वादपत्र पावलें. संतोष झाला. सनाथ केलें. बहुत दिवस आपल्या दर्शनास जाहाले. चित्ताचा उत्कट हेत समयावर प्रमाण. मजला पूर्ण भरवसा आपले आशीर्वादाचा आहे. त्याच आश्रयें योगक्षेमो चालतो. यास संदेह नाही. यद्यपि बाह्यात्कारे पत्रें पाठविण्यांत अंतराय होत होता, परंतु अहर्निश स्मरणांत आहेत. प्रस्तुत राजश्री रामदासपंतांचा बहुत उत्कर्ष जाला व मुख्याची कृपा बहुत, हें वर्तमान आपणास विदित जालेंच असेल. माझा त्यांचा बहुत स्नेह. एक जीव व दोन शरीर, ह्मटले पाहिजे. त्यांची अजूरदार जोडी मजपाशीं आली. मजला बहुत लिहिलें आहे की, सैन्यास येणें, मुख्याचें सत्कारक्षपत्रही पाठवून देतों. खडकी, तापीपूर येथील कामापैकी जें काम चित्तांत असेल तें लिहिलियाने करून पाठवीन, तूं सैन्यास येणें, अनुकूल न पडे तरी सैन्य खडकीस आलिया अगत्य येणें. ऐशा कितेक गोष्टी लिहिल्या आहेत. म्या उत्तर लिहिलें की, मजला केशवरावजीची चाकरी टाकणें नाहीं, हें वतन आहे. राखिलें (पाहिजे) तुह्मी खडकीस आलियावर येईन. रामदासपंत बहुत गृहस्थ उदार आहे. इ. इ. इ.