[३७२]B श्री. ३१ डिसेंबर १७५०.
पे॥ पौष शुध्द १५
शके १६७२.
श्रीमंत राजश्री पंतप्रधान यांप्रती :-
वासुदेव दीक्षित अनेक आशीर्वाद उपरि येथील क्षेम पौष शुध्द पौर्णिमा सोमवार जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. आपण सांडणीस्वाराबराबर पत्र पाठविलें तें पौष शुध्द ९ बुधवारी संध्याकाळी पावोन वर्तमान कळों आलें. त्यासमयीं स्वार होऊन गेलों. खानाची भेट घेतली. एकांतीं पत्रार्थ सांगितला. तें ऐकोन उत्तर दिल्हें कीं, यजमानाचें विपरित वर्तमान आल्यावरी आह्मांस कयाम तशी भासली, अत्यंत फिकिरीत होतों. त्यास, हें तुह्मी वर्तमान सांगितलें व त्यांचे पत्र आलें, येणेकरून चित्तास समाधान जाहालें. तो बयान कोठवर करावा. सर्व आश्रय तुमचाच आहे. दोन मतलब लिहिले, अवरंगाबाद व बऱ्हाणपूर दोनी सुभे व खजाना ऐसे आमचे हवाला करावा, जेणेंकरून कर्जपरिहार होय ते अर्थ करावा, आपले सर्व प्रकारें जागीर मनसब घेऊन आमचे हातून आपलें बरें करून घ्यावें, हा उत्तम पक्ष. दुसरा प्रकार :- नासरजंग यांचे लेक अथवा भाऊ यांस उभे करून आह्मांस कर्जपरिहारार्थ व फौजेचे एक वर्षाचे बेगमीस ऐवज देऊन आह्मांस सामील करून घ्यावें, वराड वगैरे जागांची फौज व तोफखाना जमा करून आह्मांसमागमें *चलावें.