[३६१] श्री.
पुरवणी श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्रीपरमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
दंडवत् विनंति उपरि. महाळुंगेयाचें लिहिलें तें साद्यंत अवगत जालें. ऐशास, सर्वांस श्रेष्ठ राजा. राजाचे आज्ञेनें सर्वांही वर्तावें. ते गोष्ट नाइकतां अमर्यादेनें वर्तों लागले. तेव्हां आह्मीं सांगितल्यानें देहावरी येऊन सुरळीतपणें वर्ततील कीं काय ? सामें सांगतां नायकत. तेव्हां दंडें सांगावें. दंडें सांगतां परस्पर कलह निर्माण करावा. एक शह सावताचा; दुसरा शह इंग्रेजाचा; तिसरा समयोचित शामळ. ऐसे तीन शह सबळ असतां चवथा आपणच निर्माण करावा ऐसें होतें. यास्तव, सबूरीच केली आहे. पुढे राजदर्शन जाल्यावरी त्यास जें नसीहत करणें तें हुजूरून करूं. राजापूरपावेतों त्याची धमक आहे ह्मणोन लिहिलें. तरी त्याचा विषय सेवास आहे ऐसें नाहीं. मारून गर्देस मेळवितो. हा स्वामीस निशा असो द्यावे. वरकड कितेक शब्द लावून लिहिलें, तरी मी लेकरूंच आहे. एकवेळ शब्द लावितील, दुसरे वेळ नावाजीस करतील. मी तों एकनिष्टेनें स्वामीचे चरणी वर्तत आहें. विशेष काय लिहूं. कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.