[३५९] श्री.
पु॥ श्रीमत् महाराज राजश्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना बचेरा घोडा व शालजोडी अंगावरील प्रसाद तुह्मांस पाठविला आहे. निष्ठेकरून घेणें ह्मणोन आज्ञा. यास स्वामीचे आज्ञेप्रमाणें शालजोडी शिरसा वंदिली व बचेरा घोडा घेतला. विदित जालें पाहिजे. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.
[३६०] श्री.
पुरवणी. श्रीमत्सकल तीर्थस्वरूप श्रीपरमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति ऐसीजे. स्वारीस गुराबा व नव गलबतें बाहेर वाऱ्यावर रवाना केली होती. त्यांणी सुरतेहून गुराबा चार व तावडा एक जिन्नस भरून कोळेकोटास जात होता. त्यांची व गुराबाची गांठ पडली. ती पांचही गुराबा व तावड दरोबस्त पाडाव करून जंजिरें सुवर्णदुर्गास आणिली. व कुलाबियाहून समशेर व नागीण दोन गलबतें पाठविली होतीं. त्यांणी सुरतेच्या नाळींतून पांच गलबतें आणिलीं. हें वर्तमान सविस्तर स्वामीस कळावे याकरितां लिहिलें असे. खजूर, खारीक पाठवावयाविशीं आज्ञा. आज्ञेप्रमाणें पैबस्तपैकीं पाठविलें असे. वजन खरें.
याप्रमाणें पाठविलें आहे. प्रविष्ट होऊन पावलियाचा जाब सादर करणार स्वामी वडील आहेत. बहुत काय लिहिणें. हे विनंति.