[३५२] श्री.
पुरवणी श्रीमद्भार्गवस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
विज्ञापना. लहान माणसें जाऊन भलत्या गोष्टी सांगतात. त्या ऐकोन, तेंच खरें वाटोन, कागदपत्रीं दुरुक्ती भाषणें लेहून पाठवितां. आह्मी कोठपर्यंत पत्री ऐकावें ? कर्जाचा प्रसंग जरी, खासे कुलाबास होते, ज्या जिल्ह्यास खर्च झाला त्या जिल्ह्यास जे अंमलदार आहेत, त्यांच्यापासून कर्जाचा परिहार करून घ्यावा. आपल्यास बरें वाईट बोलिलें तरी आह्मांस आशीर्वादात्मक आहे. वरकड जें होणें जाणें तें ईश्वराचे स्वाधीन आहे. आमची निशा असेल तशी आह्मांस फलश्रुति होईल. आह्मी वडिलाचे पायाजवळ एकनिष्ठ आहों. परिणामी कळों येईल. इतके ल्याहावयासी कारण कीं, आपण मन मानेल तैसे लिहितात; परंतु, बावा ! सर्व आमची जोड आपण आहेत. याउपरी राग न करावा. येऊन आपला मनसबा चालवावा. आह्मांस काशीयात्रेस निरोप द्यावा. हें न करा तरी वडिलास श्रीभार्गवाची आण आहे. अपत्यास वडिलाचे पायाखेरीज जोड नाहीं. यासी साक्ष श्री आहे. हे विज्ञापना. हे विनंति.