[३४०] श्री. १६ जुलै १७३४.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें लक्ष्मीबाई साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति उपरी येथील कुशल आषाढ बहुल द्वादशी भौम वासर पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून यथास्थित असे. विशेष. बहुता दिवसांनीं स्वमींनीं कृपोत्तरें गौरवून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्टकाली हर्ष जाहला. तो श्री जाणें ! याचन्यायें सार्वकाल आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करावया स्वामी सर्वज्ञ समर्थ आहेत. यानंतर हरणैस देवालय नूतन केलें त्याची स्थापना केली ह्मणोन आईकोन संतोष पावल्याचा अर्थ; व हे राज्यांतून जात असतां बाजीरायांनी फिराऊन वैशाखशुध्द त्रयोदशीस धावडशीस आल्याचा वृत्तांत; व हस्तीचे वेळेस श्रमी कैलासवासी यांनी केल्याचा भावार्थ; व सुवर्णदुर्गी असतां मैत्री करून पंधराशें होन दिल्हे; कुलाबां चित्तवित्त दिल्हें घेतलें तें तुह्मांस विदित आहे ह्मणोन; व त्याचें बरें होऊन आपलें बरें न जाहालें; चित्तवित्त तुह्मांकडे बुडालें व रसाळगडी नास जाला तो तुह्मांस कळलाच आहे; जयसिंगानें तुह्मी उदक घालून कृष्णंभटाचे देशमुखीच्या सनदा करून दिल्या त्याही तुझ्या लेकानें दूर करून अनंत प्रभूस निमे वतन करून दिल्हें ते तुह्मांस कळलेंच असेल; आता रुका पैका नलगे; मळविलें राजरक्षण जाहल्यास आपण सुखी ऐसा कित्येक विस्तार व देवकार्यावर अथवा स्वामिकार्यावरी एकसान असावें याचा उपदेश; व प्रपंच सोडून कृष्णास्नानास ह्मणून दर्शन घ्यावयाचा पर्याय; व अननासें, कालींगणे काशीफळें पाठवावयाचा विचार; कैलासवासी यामागें तुजला कर्तेपणाचा आटोप असोन कोणास मानत नाहीं; ह्मणोन आज्ञाविलें तछूवणें आनंदाश्रुपातलहरी प्राप्त होऊन समाधान वाटलें. स्वामीच्या अमृतोत्तराचें उत्तरप्रत्योत्तर म्यां करावें ऐसें सामर्थ्य नाहीं.