[३३९] श्री. १७ मे १७३१.
श्रीसच्चिदानंदकंद भृगुनंदन स्वरूप श्रीमत् परमहंसबावा स्वामीच्रे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाईनें साष्टांग दंडवत् प्रणाम विनंति येथील कुशल ता वैशाखवदि सप्तमी इंदुवार पावेतों सुखरूप असो. विशेष. स्वामीकडून प्रस्तुत आशीर्वादपत्र आलें नाहीं. याजकरितां चित्त साक्षेप असें. तर ऐसें नसावें. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करणार स्वामी समर्थ आहेत. विशेष चिरंजीव रा सेखोजी बावा यांजकडून दुलई व कागद लखोटा आला तो सेवेसी रवाना केला असे. व येथून आपणाकारणें कुंकू वजन खरें पावशेर पाठविलें असे. आपण अंगीकार केला पाहिजे. श्रीस गोठणेंयांस कुंकू येथून पाठविलें असे. पाठविले आहे. त्याचा व्यय आपण केला पाहिजे. यानंतर रसाळगडी चंफी बटीक ठेविली होती ती येथें आली असे. तिजला येथें ठेवावीं. अथवा कोठें रवाना करावी हें कांहीच न कळे. याजकरितां काय आज्ञा ते केली पाहिजे. व आपणाकारणें आंबे, फणस पाठविले असे. घेऊन पावल्याचें आशीर्वादपत्र पाठविणार स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान करावी. हे विज्ञापना. यानंतर त्रिंबकराव दाभाडे युध्दप्रसंगी देवआज्ञा जाहले. ईश्वरें उमाबाई यांजवर मोठे संकट जाहालें ! हें वर्तमान आपणास विदित जालेंच असे. परंतु वर्तमान स्वामीस कळावें ह्मणोन लिहिलें असें. हे विज्ञापना + हे विज्ञापना. आपणाकारणें नारळ शहाळी सुमार पन्नास रवाना केली आहेत. घेऊन पावल्याचें उत्तर पाठविलें पाहिजे. सेवेसी श्रुत जालें पाहिजे. कृपा केली पाहिजे. हे विज्ञापना.