[३३८] श्रीभार्गवराम. १२ एप्रिल १७३१.
श्रीमत् भृगुनंदनस्वरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति चरणरज मथुराबाई कृतानेक विज्ञापना विनंति येथील कुशल चैत्रवदि प्रतिपदा इंदुवासर जाणून स्वकुशल लेखन करायासी आज्ञा करणार स्वामी समर्थ आहेत. विशेष. चिरंजीव संभाजी बावा कुलाबास गेले आहेत. उभयतां बंधूंच्या भेटी संतोषें करून जाहाल्या. चिरंजीव राजश्री सखोजी बावा व संभाजी बावा येथें येऊन आमची भेटी घेतली आणि चिरंजीव संभाजीबावाची रवानगी विजयदुर्गास केली आणि चिरंजीव राजश्री सखोजीबाबा छ १४ शौवाली कुलाबास स्वार होऊन गेले. सविस्तर वृत्त स्वामीचे सेवेसी पत्रें लिहून सारंश पाठविला आहे. त्यावरून सविस्तर श्रुत होईल, कृपावृध्दीनें पावावयास स्वामी समर्थ आहेत. कलिंगणाविशीं स्वामीनीं आज्ञा केली. त्यासी गैरहंगाम जाहाला. प्रस्तुत लहानशीं होतीं ती रवाना केली आहेत. सेवेसी श्रुत होय. हे विज्ञापना.