[३३३] श्री. ३१ जानेवारी १७३१.
श्रीमत्तीर्थरूप परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें चरणरज लक्ष्मीबाई चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत. विनंति उपरी येथील क्षेम तागायत माघ शु ५ रविवार पावेतों स्वामीचे कृपावलोकनें करून वर्तमान यथास्थित जाणोन स्वानंदलेखनाज्ञा करावयासी स्वामी समर्थ आहेत. विशेष. अलीकडे आशीर्वादपत्र येऊन भाळ न जाला. ऐसें न करावें. सदैव येणारा माणसा समवेत असेपर्यंत कुशल वृत्त लेखन करून आशीर्वादपत्रीं दर्शनाचा लाभ घडून येईल. चित्तास आनंदातिशय होईल. स्वामीचे दर्शनाची अपेक्षा बहुत आहे. दर्शन जालियासी बहुत दिवस क्रमले. यांजकरितां चित्त सापेक्ष असे. कृपाकरून चरणदर्शनाचा लाभ होय तो अर्थ केला पाहिजे. यानंतर स्वामीकारणें येथून जिन्नस -
१ भोपळेयाचे बीज सोलीव, पिशवी १. |
१ कचरिया कंद पिशवी १. |
१ मध घागर १. | ० लंग ० |
येणेंप्रमाणें सेवेसी रवाना केलें आहे. अंगिकार करावयासी स्वामी समर्थ आहेत. बहुत काय लिहावें. विदित जालें पाहिजे. सेवेसी श्रूत होय हे विज्ञापना.