[३३१] श्री. ८ आक्टोबर १७३०.
श्रीमत्परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
चरणरज बाकाजी नाईक महाडिक नामजाद प्रा जंजिरे सुवर्णदुर्ग कृतानेक साष्टांग विज्ञापना ता छ ८ जमादिलावेल पावेतों येथील वृत्त यथास्थित असे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें पावोन समाधान जालें. गोवळ, अंजनवेलचे कार्यभागास फिरोन आलेत असाल ह्मणोन केळों आलें, तर सविस्तर लेहून पाठवावें, ह्मणोन आज्ञा. ऐशास पूर्वी गेलों तेव्हां चित्तायोग्य मनसबा नाहीं यांजकरितां जमावासहवर्तमान फिरोन आलों मागती जावें, त्यास येवेशीची आज्ञा श्रीमत् राजश्री बाबासाहेब यांची पाहिजे. विचारेकरून पाहतां नूतन विचार विजयदुर्गी होऊन साहेब स्वार होऊन किलोकिल्ल्यांचा बंदोबस्त केला ये जागा येऊन कुलाबेयास जाणें जाहालें आहे. तेथीलही मजबुदीचा अर्थ करून, आह्मांस मागती हरदू ठिकाणांचे कार्यभागास जाणें ह्मणोन आज्ञा करणें ते करतील. सध्यां खावंदाचे आज्ञेविना आह्मी कैसें जावें ? हें सर्व स्वामीस अवगतच असें. आह्मी जावें ऐसा हेत राजश्री प्रतिनिधीचा असे; परंतु हुकुमाविना आह्मांस निघतां नये. वरकड, सुवर्णदुर्गी कोणी असेल त्यास लेहून खरबुजीं रवाना करणें ह्मणोन आज्ञा. ऐशास, आह्मी बाणकोटीं कार्यास आलों होतों, तेथें स्वामीचें पत्र पावलें. खरबुजे यांचा यत्न केला. त्यास गैरहंगाम. हाल्लीं खरबुजीं तयार मिळालीं ते ८ सेवेसी पाठविलीं असेत. प्रविष्ट जाहाल्याचें उत्तर पाठवावयाची आज्ञा करावी. सदैव कागदीपत्रीं परामर्ष घेणार स्वामी समर्थ आहेत. हे विज्ञापना.