[३१६] श्री. २८ आगष्ट १७४४.
श्रीमत्सकल तीर्थरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना तागाईत छ माहे रजब पावेतों स्वामींच्या कृपावलोकनेंकडून अपत्याचें वर्तमान यथास्थित असें. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ श्रवणें कोटयवधि आनंद जाहाला. प्रसादवस्त्र शालेची जोडी अंगावरील पाठविली आहे हे परिधान करणें ह्मणोन आज्ञा केली. स्वामींची आज्ञा व वस्त्र शिरसा वंदोन सनाथ जाहलों. समाधिसमयीं प्रतिवार्षिकाप्रमाणें परामृषास माणसें पाठवावी, हा दंडक तुह्मीं टाकिलात, परंतु आह्मा तुह्मांस टाकीत नाहीं, ह्मणोन आज्ञा. तरी आह्मीं स्वामीस टाकून सेवेसी विस्मरण करूं नये, सर्वात्मना घडणार नाहीं व स्वामी तरी समर्थ आहेत. हें सर्व आहे हें स्वामींचे आशीवार्दाचें आहे. तेथें आपण आह्मांस सोडितील हें कसें होईल ? सर्व प्रकारें आमची चिंता स्वामीस आहे. आह्मी आपले आज्ञांकित असें दुसरा विचार नाहीं. प्रतिवार्षिकाप्रमाणें माणसें रवाना केलीं आहेत. ती सेवेसी जाऊन पावलीच असतील. अपत्यापासून अंतर पडलें नाहीं. जिनसांची आज्ञा केली कीं, तूप, दारू, ह्मैसी, बिजाईत दोन जरूर पाठवणें, अनमान न करणें, संग्रहीं नसल्या तर विकत घेऊन पाठवणें. त्याजवरून प्रेत्नेंकडून अनकुलता जाहालियाप्रमाणें रवानगीं केली असे.
ह्मैसी, दुभत्यायोग्य, गाभण्या, दाणेशुध, शीघ्रविणार, ऐशा पाहून २ पाठविल्या असेत. |
वजनी जिन्नस ॥ तूप वजन खरें. ![]() |
येणेंप्रमाणें पाठविलें असे. कृपापूर्वक मान्य करून पावलीयाचें उत्तर आशीर्वादपत्रीं पाठविलें पाहिजे. तांब्या जाया झाला ह्मणोन पाठविला तो पुन्हा नूतन करून रखमाजीसमागमें पाठविला आहे. वरकड आह्मांकडील सविस्तर वर्तमान रखमाजी मुखवचनें सेवेसी निवेदन करितां श्रृत होईल. सुरणकंदाची आज्ञा केली याजवरून स्वदेशी व मुंबैकडेस प्रेत्न करविला. परंतु या समयांत सुवर्णकंद जून उत्तम मिळत नाहीं. माघमासीं हंगाम होतो. सांप्रत आज्ञेप्रमाणें कंद पाठविले आहेत. परंतु उपयोगास येतील असे नाहीं. परंतु पाठविले आहेत. सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.