[३११] श्री. २५ सप्टेंबर १७४०.
राजश्री बाळाजी त्रिंबक यांसी :-
सू. इहिदें अबैन मया व अल्लफ. वेठयांचा रोखा जाहला आहे. त्याचे मनाचिटीविसीं लिहिलें, तरी मनाचिटी होत नाहीं. रोख्याप्रमाणें वेठया पाठविणें. जाणिजे. छ १४ रजब.
[३१२] श्री. ९ आगस्ट १७४३.
पुरवणी तीर्थस्वरूप राजश्री परमहंस बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेवून कृतानेक विज्ञापना तागाईत भाद्रपद शुध्द प्रतिपदा भौमवार पावेतों स्वामीचे कृपाकटाक्षेंकडून क्षेमरूप असों. विशेष. बहुत दिवस आशीर्वादपत्र येऊन अपत्यांचा परामृष होत नाहीं. याजकरितां चित्त सापेक्षीत असे. तरी सदैव पत्रीं सांभाळ करीत असले पाहिजें. यानंतरी प्रतिवार्षिकाप्रमाणें समाधिविसर्जनसमयीं वस्त्रें रवाना होत असतात त्याप्रमाणें वस्त्रें, शेला जाफरखानी कुसुंबी १, टोपी १, कटिसूत्र व कुपिड १.
येणेंप्रमाणें सनगें कोन्होजी सुर्वा व हरजी गोंधे यांसमागमें सेवेसी पाठविली आहेत. कृपापूर्वक अंगीकार करून आशीर्वादपत्रीं गौरविलें पाहिजे. बहुत काय लिहिणें कृपा असों दीजे हे विनंति.