[३०८] श्री. जानेवारी १७४२.
स्वामीचे सेवेसी विज्ञापना.
सकल सौभाग्यादि संपन्न मातु:श्री गिरजाबाई याणी राजश्री सरखेल साहेबाबराबरी अग्निप्रवेश केला. त्याणीं आपणाकारणें सकलाद नारगी एक व चिकसाचें सामान पाठविलें आहे. कृपा करून घेतलें पाहिजे. हे विज्ञापना.
[३०९] श्रीभार्गवराम. २७ फेब्रूवारी १७३८.
श्री सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मानाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन साष्टांग दंडवत प्रणाम विनंति उपरि येथील क्षेम तागाईत फाल्गुन बहुल पंचमी पावेतों मुकाम जंजिरे कुलाबा सुखरूप जाणून स्वामींनीं आपणाकडील कुशलार्थ सदैव येणारांसमागमें आशीर्वादपत्रीं लेखन करून अपत्यवर्गाचा सांभाळ करीत गेलें पाहिजे. विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन आनंदावाप्ती जाहाली. खाजगत कोठीचा हाशील पेणचे खोतांनीं घेतला आहे, ह्मणोन रखमाजी कोटवळा याणीं सांगितलें त्यावरून लिहिलें आहे. तरी कोठी देवाची आहे. जो हाशील घेतला असेल तो देववणें, ह्मणोन आज्ञा. त्याजवरून पेणेसे लिहून स्वामीचेंच माणूस तेथील अम्मलदाराजवळ पाठविलें होतें. त्याचा न्याय पाहतां रखमाजी यांनींच लबाडी केली. वरकड पूर्वी स्वामीचेंआज्ञापत्र आलें कीं पंधरा खंडी मीठ एक खेप पेणेस देववणें. त्याप्रमाणें दस्तक दिलें होतें. तें मीठ घेऊन गेला. दुसरें भरगत दस्तकाखेरीज केली त्याचा हाशील सहजच खोतास घ्यावा लागला असेल. वरकड आपले सनदेस नौदीगर करीसा कोण आहे ? येविशींचें वृत्त सविस्तर आपणाकडील मनुष्य सांगतां अवगत होईल. बहुत काय लिहिणें. कृपा निरंतर असो दीजे. रा छ १८ जिलकाद. हे विज्ञापना १००००.