[२९८] श्री. १० नोव्हेंबर १७४२.
सहस्रायु चिरंजीव तुळाजी आंगरे यासी आज्ञा केली ऐसीजे :-
तुह्मीं धावडशीस दर्शनास यावयासी आणि पार्थिवलिंग करावयासी गांठ पडली. देवानें प्रसाद दिला तोच प्रसाद तुह्मास ताईत भरावयासी दिल्हा. तुह्मी लि॥ जें, आह्मीं तुमचे पदरचे, सर्व वडील कुळदैवत तुह्मी. तर सभ्यानें जो माझे हृदयीं भालें मारिले ते देवानें तत्क्षणी कां दिलें, ह्मणून तुह्मीं तख्तीं बैसलेत ! तो शापदग्ध माझे श्रापानें मेला ! तो दंश त्याचा ! तें देवानें मोठेसें माझें उरावरील शैल्य काढिलें ! मजला उभे उरावरी मजला त्याणें लाथ मारिली होती ! मी या राज्यांतून काळें तोंड करून जावें ! श्रीनें कांहीं दृष्टांत दाखविला ! तूं जाऊं नको. तुझें पारपत्य करीन. तें पारपत्य केलें. तूं तख्ती बैसलास. मजसीं बरेंपण केलियासी सुदामाची गत होईल. वैरपण केलियासी रावणाची गत होईल. ऐसें असोन इतका परिहार कशास लि॥? व्याजाचे माझे तीन लाख रु॥ जाहले. आपले पूर्वज नरकांतून काढणें असेल तर रु॥ देऊन उतराई होणें. अशी वासना धरली तर राज्यापासून तुह्मांस यश येईल व तारवें भरली येतील. आह्मांस तर उणें नाहीं. आह्मीं देवाचे भीकमागेच आहों ! गोठण्याचें काम जवळचे जवळ तुह्मीं पाहिलेच आहे. असें असोन आह्मांस रागेजोन रुसोन पत्र पाठविलें. तर लोक लाखानलाख रु॥ आपले पदरचे देऊन आह्मांस संतुष्ट करितात ! आह्मीं तर तुमचे पूर्वज नरकांतून काढितों ! तुमचे पूर्वज इच्छितात जें, आमचे वौशीं कोणी तरी देवाचें कर्ज देऊन बावाचा आशीर्वाद घेऊं. ऐसें इच्छितात. इलाची पाठविली ते कामाची नसे. शेरभर फोडल्या तर पावशेर निघतना ! वरकड जिन्नस पाठविला तो लि॥ प्रा॥ तीन मण उणा भरला ! बजिन्नस पैक्यांत धरणें. गोठणेकर यांसी वेठ धावडशीची पडत्ये तर वेठ-बेगारीचा उपद्रव एकंदर गोठण्यास न देणें. डोरले, महाळुंगे येथें पूर्णगडचा हवलदार उपद्रव देतो. तर त्यासी ताकीद करून उपद्रव साठवलीकडील व पूर्णगडाकडील लागों न देणें. जाणिजे. तारवें जर तुमचीं भरिलीं, स्वारीहून फत्ते करून आलीं, तर मजला माझे पैक्यांत नगदी रु.॥ १५,००० व पालखी आह्मांस न्यावयासी पाठवणें. ह्मणजे आह्मीं तुमचे भेटीस येऊन तुमचे मस्तकीं हात ठेऊन पोक्ता आशीर्वाद देतों व सरंजामही ठीक करून देतों. कळलें पाहिजे. राज्यादिकामध्ये तुमची कीर्त नांव होई ऐसें करून. येणेंकडून राजा संतुष्ट होईल. इतका आप्तपण दाखवून पत्रीं परिहार लि॥, तर मागें माणसें पाठविलीं तेव्हां परत माणसें अपमान करून रिकामीं पाठविलीं तेव्हां विवेक करावा होता ! बरें जाहली गोष्ट येत नाहीं. आतां तर पूर्वजांस उद्धरणें ! बहुत काय लिहिणें हे आज्ञा. दोघे भाऊ एकत्र जाहल्यानें पाल, राजमाची, शत्रू हातास येतील. घेतलीं स्थळें हातास येतील. मानाजीनें क्रिया केली जे, जर मी तुळाजीशीं दोन भाव धरीन तर क्रिया आमचे पायाची केलीन. ऐसा तो मनाचा मोकळा जाहला. तर तुह्मीं मन मोकळें करून एकरूप होणें.