[२९७] श्री. १० नोव्हेंबर १७४२.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे कृतानेक विज्ञापना ता॥ कार्तिक बहुल दशमी सौम्यवासर पावेतों वडिलांचे आशीर्वादें अपत्याचें वर्तमान यथास्थित आहे. विशेष आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्टकाळी मस्तकी वंदून लेखनार्थश्रवणें समाधान जाहालें. पत्रीं कितेक बुध्दिवादाचा अर्थ व कैलासवासी वडिलांच्या कर्जाच्या परिहाराचा अर्थ विशदें लिहिला. ऐशास, अपत्यास वडिलांहीं बुद्धिवाद सांगोन वर्तवावें हें उचितच आहे. वडिलीं, बावा ! तुमचे चरण सन्निध काय ह्मणून केले कीं पुढें आपले वंशास व राज्यास आशीर्वाद देऊन कल्याण करावें. तो अर्थ बावा ! तुह्मीं एकीकडेस ठेवून, आह्मांवरी अवकृपा करून, चित्तांत विपर्यास आणून, विषादाची वृद्धीच केली. पर्जन्यकाळीं व्रतस्थ होतेस तेसमयीं वडिलांचे सेवेसी वस्त्रें, पत्रें देऊन जोडेकरी पाठविले होते. त्यांचा धि:कार करून वस्त्रें फिरोन पाठविलीं. तेव्हां अपत्यास अपूर्व भासलें. किंनिमित्त ? इतका क्रोध करावयास कारण काय ? हा सर्व मामला बावा ! तुमचे अशीर्वादाचा. ऐसें असोन आपले मामलियावरी अवकृपा केली तरी यामध्यें आमचें काय जातें? शेवटीं बोल लागतां, बावा ! तुह्मा वडिलांसच लागेल. ये गोष्टींचा विवेक वडिलांहीं बरासा चित्तांत आणून कर्तव्य विचार तो करावा. वरकड कर्जाचा अर्थ लिहिला. तरी प्रस्तुत येथील प्रसंग आहे हा सर्व वडिलांस विदित आहे. हल्लीं आरमार स्वारीस रवाना केलें आहे. वडिलांचे आशीर्वादेंकरून प्राप्त झाल्यास सर्व आहे हें वडिलांचेच आहे ऐसें चित्तांत आणावें. आह्मांस वडिलांचे पायांविना दुसरें दैवत नाहीं. वडिलीं कृपा करून अपत्याचा लौकिक उत्तम प्रकारें वृद्धीतें पावे ते गोष्टी करावी. जिनसाविशीं आज्ञापिलें त्यावरून जिनसा पाठविल्या आहेत. त्याची पुरवणी निराळी आहे. प्रविष्ट जालियाचें प्रत्योत्तर पाठविलें पाहिजे. येविशीं विस्तार ल्याहावा तरी स्वामी वडील आहेत. सेवेसी श्रृत जालें पाहिजे. हे विनंति. हे विज्ञापना.