[२९६] श्री. १२ फेब्रुवारी १७४२.
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें तुळाजी आंगरे चरणावरी मस्तक ठेऊन कृतानेक विज्ञापना. येथील कुशल तागाईत माघ बहुल चतुर्थी भृगुवासर पावेतों स्वामीचे कृपेकरून अपत्यांचें वर्तमान यथास्थित आहे. विशेष. अंताजीपंत, खंडोजी बराबरी स्वामींनी आशीर्वादपत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन मस्तकीं वंदिलें व सविस्तर राजश्री अंताजी नारायण याणींही निवेदन केलें त्यावरून कळों आलें. व आपण पत्रलेख केला कीं, तुमचें वडिलाचे वेळचे रुपये एकूण साठ हजार येणें आहेत. ह्मणून कितेक विशदें लिहून पाठविलें त्यावरून कळों आलें. ऐशास स्वामीचें कर्ज आह्मीं वारून देऊन वडिलांस निर्मुक्त करावें हें आह्मांस उचित आहे. परंतु प्रस्तुत प्रसंग आह्मांवरी ओढीचा पडला असतां स्वामींनी आमचें हरएक पदार्थें अनुकूलता करून देऊन मनसबा चालवावा, हे बावा ! तुह्मांस अगत्य असावें. बरें ! उरफाटें अपत्यांस शब्द लावून लिहिलें तरी अपत्य कांहीं स्वामींचे सेवेसीं चुकणार नाहीं. सर्वस्व आहे हें बावाचें आहे. तेथें कांहीं विनाभाव किमपी नाहीं. आह्मीं स्वामींचा आशीर्वाद घेऊन पुढें मनसबा चालवावयास उमेदवार आहों. तरी स्वामींनीं कृपादृष्टि करून संपूर्ण आशीर्वाद देऊन अभिमानपुरस्कर चालवून पुढें आमचे हातून सेवा घ्यावी. वरकड कर्जाचा परिहार करून वारावें हें श्रेयस्कर आहे. प्रस्तुत अनुकूल वारावयास जाहलें नाहीं. स्वामीचें आशीर्वादेकरून कर्जाचा निशा करून देऊन. यास अंतर होणार नाहीं. तपशिलें अर्थ लिहून पाठविलें आहे ह्मणोन स्वामींनी चित्तांत विशमता न मानावी. आह्मांस वडिलपणें बुद्धनीत सांगोन वडिलांचे नांव रक्षे आणि आमचा लौकिक उत्तम होई तो अर्थ संपादून अपत्यांस दिला पाहिजे. आह्मांस स्वामींचे पायांवांचून दुसरें दैवत नाहीं. सविस्तर अर्थ मुखजबानी अंताजीपंत, खंडोजी, सांगतां सेवेसी श्रुत होईल. विदित जाहलें पाहिजे. हे विज्ञापना.