[२९४] श्री. १ फेब्रुवारी १७३३.
श्रीमत् परमहंस परिव्राजकार्य भृगुनंदनस्वरूप बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें मथुराबाई चरणावरी मस्तक ठेवून साष्टांग दंडवत विनंति येथील कुशल माघ बहुल त्रयोदशी गुरुवार पावेतों स्वामीचे आशीर्वादेंकरून सुखरूप असों. विशेष. स्वामींनी कृपा करून आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थश्रवणगोचरें परम कांहीं आनंद जाहाला. तो श्री जाणें ! यानंतर नारायण हरकारा याजवळ आह्मीं बोलिलों कीं, गोसावी यांणीं दाटूनच आपणास उपदेश दिल्हा ह्मणोन; व बावांहीं उदक घालून जें होतं तें अवघेंच कैलासवासीयांस दिल्हें असतां, आतां पैके कशाचे मागतात; व आज्ञेवांचून रसाळगडाहून पांच हजार रुपये सातारचे मुक्कामीं नेल्याचा अर्थ; व प्याला एक घेतला होता त्याबद्दल रागास आल्याचा तपशील; व शिरा काढिल्या ते वेळेस भास्करराऊ असतां, बावा तुमचा रुका आपण ठेविणार नाहीं ह्मणोन शपथ केल्याचा भावार्थ, व द्रव्य मेळविलें तें श्रमें करून सार्थकीं व्यय केल्याचा पर्याय; व दत्त देता कार्यास न ये; व देवाचा रुका ठेविल्यास अकल्याणावह; व हत्तीमुळें कोंकण त्याग केलें; बापूजीचे महाजनकीचा मजकूर; व पूर्वी बजूबाई राजूबाई यांच्या वोटया होनानी भरिल्या होत्या हें वृत्त तुह्मांस अवगत असतां आपला अपमान केला ऐसें कितेक विस्तरेंकरून शब्द लावून आज्ञापिलें. तें अक्षरश: श्रवण होऊन त्याचें उत्तर ल्याहावयास स्वामीपुढें सामर्थ्य नाहीं. तथापि स्वामींनी आज्ञापिला अर्थ त्याचा जाबसाल न जाहाला तरी स्वामीस कोप येऊं शके, यास्तव, यथाज्ञानें लिहिलें तें तें स्वामींनीं कृपा करून श्रवण करावें. ऐसें जे- उपदेश न मागतां दिल्याचा अर्थ- स्वामीचे सेवेसी विदित जालें तें यथार्थच असे; परंतु येथें नारायण स्वामीकडून आला तेव्हां स्वामीच्या संतोषाचें वृत्त व आह्मांस काय ह्मणत होते ऐसें पुशिलें. त्याचें उत्तर त्यानें केलें जे- राजश्री सखोजी बाबा यांस व आपणांस गालिप्रदानें करीत होते. कारण काय तर पैके आपले देत नाहीं, व आपण हस्तक बाईस व्यर्थच दिल्हा व आपण कारभार करून येऊन बाकाजी नाईक यांस कुलाबा नेविलें, ऐशीं दोन चार निमित्तें ठेऊन कोपले होते, त्याचा तपशील सांगतां पुरवत नाहीं, ऐसें बोलिला. त्याजवर आपण इतकेंच बोलिलों कीं- बाबांनीं पैकेयास्तव कोपास यावें ऐसें नाहीं.