[२९१] श्री.
श्रीमत् परमहंस परिव्राजकाचार्य बावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल दंडवत विनंति उपरि येथील कुशल स्वामींच्या कृपावलोकनें सुखरूप असों. विशेष. सेवक राजदर्शनास आलों. येथें स्वामींनीं येऊन कितेक पदार्थें अपत्यांचें साहित्य करून गौरव करवावा हें आपल्या वडीलपणांस उचित होतें. परंतु तो विचार स्वामींनीं न केला. बरें ! श्रीइच्छेस उपाय नाहीं. प्रस्तुत आह्मांस येथें खर्चाची ओढी विशेष झाली आहे. आपणापाशीं उसनवार रुपये पांच हजार मागितले आहेत. तरी कृपाळू होऊन सदरहूप्रमाणें रुपये अगत्य जाणून पाठवून द्यावे. येथील प्रसंग उरकून पूर्वस्थानास पावतांच स्वामींचा टक्का प्रविष्ट करून देऊन. अंतर नव्हे. येथें अगत्य समजून रुपये पाठविले पाहिजे. समयोचित लिहिलें आहे. आपल्या वडीलपणांस योग्यता असेल तें करावें. वरकड पुरल्या सकलाद सुसीविसीं लिहिलें, तरी ते गोष्टीचा विशेष काय आहे ? आपणांकडून पुन्हा माणसें येतील त्यांजबरोबर पाठवून देतों. तपसील लिहावें तरी वडिलांस पाल्हाळ लिहावा. यामध्ये उत्तम विचार नाहीं. ह्मणून अल्पामध्यें लिहिलें आहे. बहुत काय लिहिणें. कृपा लोभ विशेष केला पाहिजे. हे विनंति.