[२९०] श्री.
राजश्री बाजीराव पंडित प्रधान दाजी गोसावी यांसी :-सकल गुणालंकरण अखंडित लक्ष्मी अलंकृत राजमान्य स्नेहांकित संभाजी आंगरे सरखेल रामराम विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन केलें पाहिजे. विशेष. आपण पत्र पाठविलें. प्रविष्ट होऊन सविस्तर अर्थ कळोन संतोष जाला. अंतप्रभू कानडा याची देशमुखी काढून कृष्णंभटास करार करावा आणि अंतप्रभूस घाटावरी लावून द्यावा. ऐशास तीर्थस्वरूप राजश्री कैलासवासी खासे यांणीं मनसुबी करून मजहर करून दिला. अलीकडे कैलासवासी राजश्री दादा यांणीं श्रीमत् भार्गवस्वरूप बावा यांचे आज्ञेवरून अंतप्रभूस दूर करून कृष्णंभटास कागद दिल्हा. तेव्हां आपलें नांवें पत्र दादांनीं लिहून पाठविलें कीं, बावाचे भाडभिडेनें कागद दिले आहेत. तोच कागद बजिनस अंतप्रभूनें येथें दाखविला. त्यांस थोरले खाशांनीं केलें त्याप्रमाणें आह्मीं करार करून दिले आहेत. तरी चित्तास नये तरी बावांनीं दोघांची समजावीस करून द्यावी. वरकड बावाची वस्तभाव रसाळगडी आहे, ती पेशजी देविली आहे. हल्लीं आपण लिहिलेवरून तेथील किल्लेदारांस पुरवणी पाठविली आहे. आपणांस कळावी. ह्मणून लिहिलें आहे. जाणी चंद्र २२ जमादिलाकर. बहुत काय लिहिणें. लोभ असो देणें. हे विनंति.