[२८४] श्री. १२ एप्रिल १७४०.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप परमहंसबावा वडिलांचे स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी सरखेल साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल ता। चैत्र बहुल पंचमी मंदवार पावेतों मुक्काम अलिबाग स्वामीचे कृपेनें जाणून स्वकीय कुशल लेखन करावयास आज्ञा केली पाहिजे. विशेष. आरमारसहवर्तमान साकरियाचे खाडींत शिरोन अलीबाग, हिराकोट, थलचा कोट, राजकोट, सागरगड हे जागे स्वामीचे कृपेनें फत्ते जाहले. पालीस निशाण पाठविलें होतें; परंतु राजश्री बाजीराऊ प्रधान यांचा जमाव येऊन निशाण चढलें. राऊत व जमाव पालीखालीं आला आहे. मानाजीच्या कुमकेस अलीबागेस येऊन आह्माबराबरी घसघस करणार. इंग्रजही आला आहे. याउपरि आपला आशीर्वाद समर्थ आहे. यासमयीं कुमक करावी व स्वता राजश्री स्वामीनीं यावें ह्मणोन विनंतिपत्र लेहून देऊन राजश्री विसाजीराम व दत्ताजीराऊ विचारे पाठविले आहेत. आपणही राजश्री स्वामीपावेतों जाऊन सांगोन हे गोष्टीचें सार्थक होऊन येई तें करावें. हा समय अडचणीचा आहे. आह्मीं येथून निघत नाहीं. राजश्री स्वामी येऊन सनाथ केलें तरी बरें. आह्मीं एक स्वामीवांचून दुसरा वगवशीला जाणत नाहीं. सर्व भार आभार धण्यावरी आहे. हें जाणोन यांस पाठविले आहेत. राजश्री स्वामीनीं येऊन मनसबा सिद्धीस नेला तरी उत्तम जाहलें. नाहीं तरी ईश्वरीछा प्रमाण ! दुसरा विचार नाही. आपणास जें सुचेल व उचित असेल तसें करावें. ज्या ज्या कडून जसजसें साहित्य होईल तसें करावें. सर्व भरवसा वडिलांचा आहे. विस्तारें काय लिहावें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विज्ञापना. सविस्तर रा। विसाजीराम स्वामीस सांगतील. त्याप्रमाणें राजश्री स्वामीजवळ आपण खासा जाऊन रा। चिमाजी आप्पास कागद व इंग्रजास कागद व मानाजीस कागद देवावे. हें काम अगत्य करावें. हे विज्ञापना.