[२८१] श्री.
श्रीमत् परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
विनंति उपरि खंडोजीबराबरी स्वामीनीं प्रसाद दिला. वस्त्र चादर एक पाठविली ते प्रविष्ट जाहली. विदित जाहलें पाहिजे. बहुत काय लिहिणें. कृपा वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.
[२८२] श्री. १५ जुलै १७३८
श्रीमत् तीर्थस्वरूप परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल साष्टांग दंडवत विज्ञापना येथील कुशल श्रावण शुध्द दशमी मंदवारपर्यंत स्वामीचे आशीर्वादें कुशल असे. विशेष. पत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थनवणें संतोष जाहला. कितेक पूर्वापार वडिलांपासून कर्तव्यतेचा विस्तार लिहिला. तरी मुख्य स्वामीचा आशीर्वाद. तदनुरूप होणें तें होत असे. समाधीहून उठलियानंतर भेटीस येऊन, ह्मणोन लिहिलें. तरी याजपेक्षां अधिकोत्तर दुसरें आहें असें नाहीं. उघाड पाहून आलें पाहिजे. राजश्री चिमाजी आप्पा यांजकडून पत्र पाठविलें व उभयपक्षींच्या स्नेहाची दृढता व्हावी ह्मणोन लिहिलें. तरी स्नेहाभिवृध्दी व्हावी ही गोष्ट उचितच आहे. ऐशास, स्वामी येथें येणारच आहेत. आल्यानंतर त्यांजकडील स्नेहाचा विचार स्वामीच्या विचारें केला जाईल. आपले वचनाचें आह्मांस प्रमाण आहे. सदैव आशीर्वादपत्र पाठवून सांभाळ करावा. रा। छ ८ रबिलाखर सेवेसी श्रृत होय. हे विज्ञापना.