[२८०] श्री. १८ फेब्रूवारी १७३८
श्रीमत् तीर्थरूप परमहंसबावा वडिलांचे सेवेसी :-
अपत्यें संभाजी आंगरे सरखेल कृतानेक दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत फाल्गुन शुध्द दशमी मंदवासर पावेतों वडिलांचे आशीर्वादें सुखरूप असों. विशेष. स्वामीनें धोंडू तेली याजबराबरी आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन संतोषावाप्ती जाहली. ऐसेंच सर्वदा पत्र पाठवून सांभाळ करणार आपण वडील आहात. स्वामींनीं जिनसाविषयीं विशदें लिहिलें. ऐशास जो जिन्नस पाहिजे तो पाठवून देऊन ह्मणोन लिहिलें. दोन-चार वेळां स्वामीस लिहून गेलें असतां फिरून फिरून लिहितां यावरून वडिलपणांस योग्य आहे. बहुत काय लिहिणें. लोभ असों दिला पाहिजे. हे विनंति.