[२६२] श्री.
पुरवणी श्रीमत्सकल तीर्थास्पदीभूत श्री परमहंसबावा स्वामी वडिलांचे सेवेसी.
विनंति उपरी. पूर्णगडचें देवळ सिद्ध जाहालें. माघमासीं लिंगस्थापना करावयास मुहूर्त आहे. ऐशास आपणा- कडून भला माणूस पाठवून श्रय घ्यावें ह्मणोन लिहिलें. ऐशास जो स्वामीकडून या कार्यास पूर्णगडास जाईल तो आमचाच आहे. दुस-याचें प्रयोजन नाहीं. जयगडीहून सामान पाठवावें ह्मणोन लिहिलें त्याजवरून :- ![]() येणेंप्रमाणें देविलें आहे. होन्यावरून पूर्णगडास पावून देतील. शाकभाजी पूर्णगडीहून देविली आहे. स्वामीनें कार्य संपादून श्रय घ्यावें. |
सकलाद पाठवावयाविशीं आज्ञा केली. त्यास सकलादेच्या यत्नांत बहुतकरून आहों. स्वामीस पाठवावया योग्य मिळाल्यावरी पाठऊन देऊन अंतर होणार नाही. कुडती एक व पट्टेदार सुशीथान एक पाठवावें ह्मणोन आज्ञा. आज्ञेप्रमाणें सुशी एक थान पाठविलें आहे. कुडती सिध्द करविली आहे तयार जाहल्यावरी मागाहून पाठऊन देऊन. धावडशीस जिन्नस पाठवावा ह्मणोन आज्ञा. ऐशास खजूर, खारका हा जिन्नस नाहीं. साकर वजन ![]() अडीच मण पाठविली आहे. प्रविष्ठ होईल. |
येणेप्रमाणें विदित जाहाले पाहिजे. बागलाचे महाजनकीचीं पत्रें करून द्यावीं ह्मणोन स्वामीनीं आज्ञा केली. ऐशास येविषयींचें उत्तर पूर्वीचे स्वामीचे सेवेसी लेहून पाठविलें आहे. बहुत काय लिहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.