[२६०] श्री. १७३३.
पुरवणी तीर्थस्वरूप श्री परमहंसबावा स्वामीचे सेवेसी :-
कृतानेक साष्टांग दंडवत. प्रा। विनंति उपरी शितोळे पुणेकर याजकडील शरीरसंबंध तीर्थरूप कैलासवासी वर्तमान असतां योजिला होता. त्यास निश्चय होऊन कार्यसिध्दि व्हावी तो प्रसंग तैसाच राहिला. त्या अलीकडेस उरकावें तों येथेंच योजून आलें ह्मणून त्या शरीरसंबंधाचा विचार मनास आणिला नाहीं. प्रस्तुत राजश्री बाजीराऊ पंडीत प्रधान यांही राजश्री रघुनाथजीसमागमें सांगोन पाठविलें कीं, हा शरीरसंबंध योग्य आहे. आमचे मतें टाकूं नये. त्याजवरून अवश्यमेव करावा ऐसा निश्चय मनें केला. ह्मणोन निश्चय करावयानिमित्य पंडित मा। निले यांसी लेहून पाठविलें आहे. निश्चय होऊन लेहून आल्यावरी मागणीचाही विचार करून आपणांस कळावें ह्मणोन लिहिलें असे. व चिरंजीव संभाजी आंगरे यांसी घोंगडि याजकडील शरीरसंबंध केला होता त्याचा विचार जाहला तो स्वामीस विदित आहे. ऐशास प्रतापजी अवघड राऊ देशमुख साळोखे प्रा। चांडवळ याजकडून ब्राह्मण पत्रें घेऊन आला. मनास आणितां यथायोग्य ह्मणून कबूल करून लेहून पाठविलें आहे. त्याचें उत्तर त्याजकडून आल्यावरी कोणी भले लोक पाठवून लग्ननिश्चय करून साखरविडे वांटले जातील. हें सविस्तर वृत्त आपणास निवेदन व्हावें ह्मणोन लिहिलें असे. बहुत काय लिहिणें ? कृपा लोभ निरंतर अभिवृद्धि केली पाहिजे. हे विनंति.
[ह्या पत्राच्या पाठीवर ब्रह्मेंद्रस्वामींनीं स्वत: उत्तर लिहिलें आहे तें येणेंप्रमाणे:-]
भक्त मजकडेस दावी. मी दोनी हात वोढवी. रेटून सेवितां फेडी. अखेरशी तुझा पुण्याच्या पाशीं ऐसेंच घडेल.
सवाई जयसिंगाशी याशी आज्ञा :- तुह्मी पत्र पाठविलें तें प्र॥ होऊन संतोष जाहाला. नारायणाबराबरी पाठविले तें येणेंप्र॥ प्रविष्ट जाहालें :-
रजई पिवळी दमासाची, अस्तर लाल ताफतेयाचे, आंत कापूस घालून, फीत हिरवे, पाठविलेत ते पावले. |
दुलई किमकाफी, लाल अस्तर, पिवळा ताका चिनाई फेरवान् हिरवी. |
बाबा ! दुलई पाठविलीत ते पाण्यांत घातल्यास मज योग्य नव्हे. बाबा धाकली घेतोस आणि कांठ मज देतोस ! एवढी तातड कशास केली ? उत्तमसें एक थान आणावें होतें, आंत दमासी पिवळेचें आस्तर घालावें होतें, व एक सकलाद उंचशी, ऐसे पाठवून देणें, चिनी साखर तूट आठ शेर, खडेसाखर तीन शेर तूट आली. कलयुगीं शाप थोर आहे. शितोळे यांचे शरीरसंबंधाविशी तुह्मी बाजीवर घातलें आहे. मजवरच घातलें असतें तरी तेथवर जाऊन त्याजला मी पदर पसरतो.