[२४४] श्री. २३ फेब्रूवारी १७२९.
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्रीपरमहंस बाबा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल कृतानेक साष्टांग दंडवत विनंति उपरि येथील कुशल तागाईत फाल्गुन शुध्द सप्तमी रविवारपर्यंत स्वामीचे कृपाकटाक्षवीक्षणें यथास्थित असे विशेष. स्वामींनीं आशीर्वादपत्र प्रेषण केलें, ते प्रविष्टकालीं संतोषवाप्ती जाहली. याच न्यायें सर्वदा आशीर्वादपत्रीं परामृष करीत असिलें पाहिजे. यानंतर स्वामीनीं आज्ञापत्रीं आज्ञा केली कीं, लखजी साळवी कुंभार जांबकामी याजविशीं सौंदलकर ह्मेतर व दाभोळ सुभा व राजापूर येथील ह्मेतर व कुंभार यास ताकीदपत्रें शिक्यानिशीं पाठवणें व सौंदलकर ह्मेतर व प्रभावळीकर ह्मेतर हरदूजण धावडशीस पाठवणें ह्मणोन. त्यावरून कुंभारांस ताकीदपत्रें व सौंदल प्रभावळी या हरदू ह्मेत्रियांस धावडशीस जाणें ह्मणोन पत्रें आज्ञेप्रो। स्वामीकडे पाठविलीं आहेत. तान्या कडव व नागा कडव सोडिले होते, ते संगतरास चाकरी टाकून जाऊन फलणीस थडियाचें काम करीत आहेत. त्यांस दस्त करून आणून ठेवणें ह्मणोन आज्ञा केली. ऐशास ते श्रीपतरायांचे जिल्हेंत आहेत. त्यास दस्त करून आणण्यास विरुध्द वाटेल. याकरितां आणावयास कार्यास न ये. याचा जो यत्न करणें तो स्वामीच करितील. वरकड येथून संगतरास दोघे पाठवावयाचे ते आज्ञेप्रों येतीलच. वरकड पूर्णगडच्या हवालदारांनी मौजे माहाळुंगीचे फणस बगरहुकूम तोडले व गांवांत कितेक अवाडाव मांडली आहे. त्यांचे पारपत्याविशी आज्ञा केली. त्यावरून त्यांस दूर करून दुसरा हवालदार त्या जागां पाठवून त्यास हुजूर आणविला आहे. पारपत्य करणें ते केलें जाईल. स्वामीचे आज्ञेविना सेवकास अधिकोत्तर आहे असें नाहीं. राजश्री बाजीराव पंडित प्रधान कुलाबियास माघ बहुल त्रयोदशी मंदवारीं आले. त्यांच्या आमच्या परस्परभेटी जाहल्या. उत्तम प्रतीनें सौरस्य जाहलें. आपणांस कळावें ह्मणून लिहिले असे. बहुत काय लिहिणें ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.