[२४२] श्री. १९ मार्च १७२५
श्रीमत् सकल तीर्थस्वरूप श्रीपरमहंस बाबा स्वामीचे सेवेसी :-
अपत्यें सेखोजी आंगरे सरखेल-चरणावरी मस्तक ठेऊन शिरसाष्टांग दंडवत प्रणाम. विनंति उपरि येथील कुशल त॥ चैत्र बहुल प्रतिपदारवि वासरपर्यंत स्वामीच्या कृपावलोकनें यथास्थित असे विशेष. आशीर्वादपत्र पाठविलें तें प्रविष्ट होऊन लेखनार्थ चित्तारूढ होऊन संतोषवाप्ती जाहाली गोठणियास श्रय संपादण्यास न गेलो ह्मणून कितेक शब्द लाऊन लिहिलें, ऐशास स्वामीनीं आज्ञा केली त्याप्रे॥ जाऊन यज्ञसिध्दि करून श्रय घ्यावें हेंच मानस होतें तों इंग्रेजांची तराडी येऊन नस्तावरी बैसलीं त्याच प्रवाहीं असतां मास दोन मास जाहले. आमडेस जावे, तो चिरंजीव राजश्री संभाजी आंगरे कुलाबां आले, त्याचें समाधान करून बेगमीशेगमी करणें ते करून रवानगी केली. मधें कांही बोलाचाली होऊन रुसवा करून निघोन आले. त्याचे समाधानार्थ सुवर्णदुर्गपर्यंत येऊन चिरंजीवाचें समाधान करून काळी छ १२ सौबली प्रात:काळीं र॥ केली असे. आजी आह्मीं स्वार होऊन कुलाबां गेलों. हे साद्यंत स्वामीस कळावे ह्मणून लि॥ असे. वरकड माझी निष्टा स्वामीचे चरणीं कोणे स्थितीनें आहे हें स्वामीस न कळेसें काय आहे ? यद्यपि एखादें समयीं अंतर ही पडिलें असिलें तरी क्षमा करणार स्वामी वडील सर्वज्ञ आहेत. विशेष काय लिहूं ? कृपा निरंतर वर्धमान केली पाहिजे. हे विनंति.