[२४१] श्री. १७ ऑक्टोबर १७२१.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४८ प्लवनामसंवत्सरे कार्तिक शुध्द अष्टमी भौमवासर क्षत्रियकुलावतंस श्रीराजाशंभुछत्रपति स्वामी यांणीं राजमान्य राजश्री विठोजी चव्हाण हिंमतबहादूर यांसी आज्ञा केली ऐसीजे :- मौजे बाहे त॥ वाळवें हा गांव राजश्री त्र्यंबकराऊ सुंदर यांस इनाम आहे. ऐशास पहिले सुंदर तुकदेव होते त्यांणीं या राज्यांत बहुत श्रमेकडून सेवा केली आहे. तीर्थरूप राजश्री कैलासवासी स्वामींनी त्यांवरी बहुत लोभ करून मौजे मजकूर इनाम करून दिल्हा. तेणेप्रमाणें त्यांचे पुत्रास गांव इनाम चालवणें हें स्वामीस अगत्य. त्यास, गावकरी तुह्मी ऐवज सारा नेता ह्मणून सांगोन थोथंड करून मशारनिलेस कांही देत नाहीं. त्यांस ताकीद करून ऐवज मशारनिलेस पार्वाखणें. बहुत काय लिहिणे.
मर्यादेयं.
विराजते.