[२३९] श्री. १६ नोव्हेंबर १७१३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ४० विजयनाम संवत्सर मार्गशीर्ष शुध्द पंचमी सौम्यवासरे क्षत्रियुकुलावतंस श्रीराजा शिवछत्रपति यांणी मोकदमानी मौजे बाहे त॥ वाळवें यांसी आज्ञा केली ऐसीजे:- मौजे मजकूर र॥ सुंदर तुकदेव यांचे पुत्र र॥ त्र्यंबक सुंदर यांस इनाम दिल्हा आहे. असें असतां तुह्मीं हरामजादगी करून यांकडे गांवचा ऐवज वसूल देत नाही ह्मणून हुजूरविदित जालें. तरी ऐसी बदराह वर्तणूक करावयास गरज काय ? हे रीत एकंदर स्वामीस मानत नाहीं. याउपरि मौजे मजकूरचा सारा ऐवज सुरळीतपणें मशारनिलेकडे पाववीत जाणें. दुस-याकडे एक रुपया वसूल न देणें. फिरोन हुजूर बोभाटा आलिया स्वामीस मानणार नाहीं.
लेखनालंकार.
श्री शिवनरपति श्री आई ० मर्यादेयं
हर्षनिदान मोरेश्वर आदि पुरुष श्रीराजाशिवछत्रपति विराजते.
सुत नीलकंठ प्रधान स्वामी कृपानिधि तस्य परशुराम
त्र्यंबक प्रतिनिधि.