[२३८] श्री. २२ जुलै १७०८.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३५ सर्वधारी संवत्सरे श्रावण बहुल प्रतिपदा गुरुवासर क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी प्रांत पनाळा यांसी आज्ञा केली ऐशीजे:- र॥ सुंदर तुकदेव हे स्वामीचे कदीम सेवक, या राज्यांत कष्ट मेहनत बहुतच केली. याकरितां त्यांस मौजे बाहे त॥ वाळवें हा गांव इनाम अजराम-हामत करून दिल्हा. त्याउपरि यांचे पुत्र यशवंतराऊ सुंदर होते, त्यांस मौजे मजकूर इनाम चालव. याविशीं आज्ञा केली होती. सांप्रत ते मृत्यु पावले. त्यांचे भाऊ, सुंदर तुकदेव यांचे पुत्र कनिष्ठ, राजश्री त्र्यंबकराऊ सुंदर आहेत. त्यांचें वंशपरंपरेने चालवणे हे स्वामीस अवश्य. याकरितां मौजे मजकूर मशारनिलेस इनाम बिलाकसूर चालवायाची आज्ञा केली आहे. तरी तुह्मी हे जाणून मौजे बाहे, प्रांत मजकूर, हा गांव त्र्यंबक सुंदर यांस पुत्रपौत्रादि, वंशपरंपरेनें, इनाम, बिलाकसूर, कुलबाब, कुलकानू, चलवणें. या पत्राची प्रत लेहून घेऊन मुख्य पत्र मशारनिलेजवळ परतून देणें. लेखनालंकार.
मर्यादेयं
विराजते.
श्री
शिवनरपति हर्ष
निदान मोरेशरसुत
नीलकंठ प्रधान.