[२३४] श्री. २२ मार्च १७०८.
स्वस्ति श्रीराज्याभिषेक शके ३४ सर्वधारीनाम संवत्सरे चैत्र शुध्द दशमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शाहूछत्रपति यांणीं राजश्री देशाधिकारी व लेखक वर्तमान व भावी, सुभा प्रांत राजापूर, यांसी आज्ञा केली ऐसीजे :- रामाजी नारायण कोलटकर वास्तव्य कसबें नेवरें यांणी स्वामीसंनिध कसबें पाटगांवचे मुक्कामीं येऊन विनंति केली कीं, आपण स्वामींच्या राज्यांत राहोन, स्नानसंध्या व श्रींचे भजन करून, स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चिंतून आहों. संसाराचा योगक्षेम चालिला पाहिजे ह्मणून पूर्वी राजश्री शिवाजीराजे यांणीं आपणांस नूतन इनाम कुलबाब कुलकानू देखील हालीपट्टी व पेस्तरपट्टि, खेरीज हक्कदार करून पूर्वी राजश्री अनाजी दत्तो यांचे वेळेस जमिनीस धारा व गलियास निरख होता, त्याप्रमाणें जिराईत व बागाईत जमीन, वाडा, कासारवली, मौजे पुसाळ, त॥ नेवरें, या गावांपैकी वृत्ती करी दाभोळी ३०० तीनशें तपशील :-
हालीकीदींपैकीं करी दाभोळी ७५ । पडपैकी करी दाभोळी २२५
एकूण करी तीनशें इनाम करून दिल्हा आहे. येणेंप्रमाणें स्वामींनी करार करून दिल्हा पाहिजे, ह्मणून विदित केलें. त्यावरून मनास आणितां, रामाजी नारायण भले, हरिभक्तपरायण, स्वामीचें कल्याण व्हावें ये गोष्टीची अपेक्षा विशेष धरितात. याकरितां, यांचे लेकराचे लेकरी चालवणें अगत्य. यानिमित्य स्वामी यांवरी कृपाळू होऊन पूर्वपत्र चिरंजीव राजश्री शिवाजी राजे यांचे मनास आणून इनाम वृत्ती करी दाभोळी ३०० तीनशें करार करून दिली असे. सदरहूचीं ठिकाणें जिराईत व बागाईत, शेत व अगर, चतु:सीमा नेमून देऊन करून, यांचे दुमाला करून, यांसी इनाम वंशपरंपरेनें चालविणें. प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणें. या पत्राची तालीक लिहून घेऊन मुख्य पत्र भोगवटियास परतोन देणें. निदेश समक्ष.
मर्यादेयं
विराजतें.
श्री राजा शाहूनरपति
हर्षनिधान मोरेश्वर
सुत भैरव मुख्य प्रधान.