[२३२] श्री. २ मे १७०७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् संवत्सरे वैशाख बहुल चतुर्दशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांणीं समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री कृष्णाजी परशराम यांसी आज्ञा केली ऐसीजे :- (पुढील मजकूर २३१ प्रमाणेंच आहे.)
[२३३] श्री. २९ डिसेंबर १७५९.
पै॥ छ ११ जमादिलावल, सितैन,
पौष, कात्राबाज, मांडवगण.
सेवेसी विज्ञापना. र॥ बापूजी महादेव हिंगणे यांजकडील कारभाराचा फडशा जाला. सनदापत्रा व पातशाहास वस्त्रें वगैरे द्यावयाविशी स्वामीस पेशजी लिहिलें होते; परंतु अद्याप त्यांची कामकाजें निर्गमांत येऊन जात नाहीं. त्यास, र॥ अंताजी माणकेश्वर आले, यामुळें सावकारांस व त्यांस संशय उत्पन्न जाला आहे. कागदपत्र पुणियांत राजश्री बाबूराव फडणीस यांणी करून द्यावे तेहि दिल्हे नाही, व पातशाहास वस्त्रें, जवाहीर वगैरे स्वामीनीं पुणियास नेमणूक करून पाठवावी तेहि पाठविली नाहीं. बाबूराव दीक्षित यांणी साता लाखांची निशा केली. ते संदेहांत पडले. दहा लक्ष रुपये सहा महिन्यांअलीकडे सावकाराच्या वराता कराव्या, त्यास द्यावे, ऐसा करार आहे. त्यास बाबूराव दीक्षित संशयांत पडले. तेव्हा दुसरा सावकार कोण उभा रहातो ? अंताजीपंत आले, यामुळें लोकांनी नानाप्रकारचे तर्क वितर्क केले आहेत. यास्तव स्वामीस लिहिले आहे. तरी आपले विचारें वकिलाचा करार केला तो प्रमाणच आहे. त्यांत कांही घालमेल नाहीं, असें असल्यास र॥ बाबूराव फडणीस यांस निकडीनें लिहून कागदपत्र सर्व करून देवावे. पातशाहास वस्त्रें, जवाहीर वगैरे नेमणूक करून हत्तीसुध्दां कुल कामेंकाजें उरकून देवावीं. ह्मणजे ज्या सावकारानें सरकारची निशा केली आहे त्यास भरंवसा पुरेल व पुढील दहा लाखांचे कामास कोणी उभा राहील. कदाचित् अंताजीपंत आले यामुळें चार दिवस लांबणीवर टाकून, कोण काय बोलतो, अंताजीपंत कोठवर येतात, हा भाव काढणें असेल तर तैसेंच लेहून पाठवावें. र॥ छ ८ जमादिलावल. + वकील व दीक्षिताची पत्रें आली, ह्मणून लिहिलें. सत्वर पुण्याहून ताकीद होऊन सत्वर निर्गम व्हावा. अगर जशी मर्जी असेल तशी आज्ञा यावी. लेहून पाठवूं. अंताजीपंत कोणेप्रकारे आले आहेत तें विदित आहे. असो. आज्ञा होईल त्याप्रमाणें त्यांस लेहून पाठवूं. तेथूनही लिहिलें जावें. र॥ एकादशी मंदवार हे विनंति.