[२३१] श्री. २ मे १७०७.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ३३ सर्वजित् नाम संवत्सरे वैशाख बहुल चतुर्दशी इंदुवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शिवछत्रपति यांनी समस्त राजकार्यधुरंधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री परशराम पंडित प्रतिनिधि यांसी आज्ञा केली ऐसीजे :- रामाजी नारायण कोलटकर व॥ कसबे नेवरें यांनीं हुजूर येऊन विदित केलें कीं, वाडा चिंचवणें कर्यात नेवरें येथील नूतन देवालय बांधोन श्रीची स्थापना करावी ऐशी आपली इच्छा आहे. ऐशास, स्वामी धर्मपरायण आहेत. याकरितां श्रीचा उत्सव व आपला योगक्षेम चाले ऐशी स्वामीनीं वृत्ती करून दिल्ही पाहिजे ह्मणोन विनंति केली. त्यावरून स्वामी कृपाळू होऊन नूतन वृत्ती करून दिली आहे, करी दाभोळी :-
नूतन देवालय वाडा चिंचवणे येथील बांधोन श्रीची स्थापना करणार, याकरितां श्रीचे उत्सवास वाडा चिंचवणेंपैकी जमीन करी २०० |
रामाजी नारायण यांचा योगक्षेम चालिला पाहिजे, यांकरिता यांस वाडा कासारवली मौजे पुसाळ देखील जमीन करी ३०० |
येणेप्रमाणे पाचशें करीची वृत्ती देऊन सनदा अलाहिदा सादर केल्या असत. त्याप्रमाणें जमीन यांचे स्वाधीन करून इनाम वंशपरंपरेनें चाले ऐशी गोष्टी करणें. जाणिजे. बहुत लिहिणे तरी सुज्ञ असा. मर्यादेयं विराजते.