[२२०] श्री. २३ सप्टेंबर १७४२.
राजश्री रामचंद्र कोनेर गोसावी यांसी :-
मशरुलअनाम अखंडितलक्ष्मीअलंकृतराजमान्य राजश्री स्ने॥ रघोजी भोसले सेनासाहेब सुभा दंडवत उपरि येथील कुशल जाणून स्वकीय कुशल लेखन करीत जाणें. विशेष. तुह्मी पत्र पाठविलें ते पावोन लिहिलें वर्तमान कळो आलें. राजश्री कोनेरपंतास सांगोन नंतर तरतूद करणें ते करवीत आहों. राजश्री जयरामभटजी राजश्री सन्निध आह्मास निविस्त करीत नाहींत; फौजेची परवानगी देत नाहींत; चित्तांत संशय धरतात; व राजश्री शामजी नाईक तळेगावांहून आलेयाचा मजकूर लिहिला तोहि कळों आला; राजश्री बाबूजी नाईक जोशी यांही फौज ठेविली आहे. त्यास बनले तरी आंगेजणी करावी न करावी हे लिहिणे; ह्मणोन लिहिलें. ऐशियासी, येविशी सविस्तर राजश्री कोनेरराम यांसी लिहिले आहे. जर त्यांजकडील गोष्ट बनून आली तरी खामखा पदरीं घ्यावी आणि अनमान न करितां आह्माकडे पाठवावे. आह्मी सर्वप्रकारें निर्वाह करू. अंतर होणार नाही. जयरामभट व यशवंतराव थोरात व राजश्री विसाजीगोविंद यांची समजूत जैशी करावयाची तैसे करून, तुह्मी तयारी करून, फौजेसहवर्तमान सत्वर, जलदीनें येऊन पोहचणें. आह्मी दसरेयाचे दुसरे रोजीं एकादशीस दोन प्रहरा येथून कूच करून मजल दरमजल जात असो. दसरेयासी तुह्मी येऊन सामील व्हावें. हा करार करून तुह्मांस पाठविलें आणि तुह्मीं अद्यापवर तपशील लिहिता ! यावरून अपूर्व दिसून येतें की राजश्री भास्करराम यांजकडे फौज जाऊन पोहोंचावी कीं न पोहोचावी, हाही विकल्प चित्तांतील कळो येत नाहीं. दसरा तो होऊन गेला, पुढे दिवस कांहीं राहिले नाहीत, आणि आह्मास तो जलदीने गेले पाहिजे. असे असोन हा काळपर्यंत तरतुदीचा विचार लिहिता ! बरें ! याउपरि तुह्मी फौज घेऊन सत्वर येतां तरी उत्तम आहे ! आह्मी तो थोडया बहुतनशी येथून कुच करून जात असो. या उपरि वारंवार ल्याहावें असाहि अर्थ नाहीं. जे गोष्टी सत्वर फौज घेऊन दसरेयापलीकडे चहूं रोजांत येऊन सामील व्हा ते गोष्ट करणें. कितेक वृत्त राजश्री कोनेरराम यांसी लिहिलें आहे. त्यावरून कळो येईल. या उपरि तुह्मास तपशीलवार ल्याहावेसारिखे नाही. बहुत सत्वर सत्वर येऊन पोहोचणें. राजश्री बाबूजीनाईकाचा विचार मनास आणावयास वरचेवर राजश्री कोनेरपंतास उत्तेजन देऊन आधीं आधीं कार्य साधणें. जाणिजे. छ ४ माहे शाबान + बहुत सत्वर येणें. कळले पाहिजे. बहुत काय लिहिणे. हे विनंति.